बीएचआर घोटाळा : ४० पेक्षा जास्त साक्षीदार, ठेवीदारांचे नोंदविले जबाब

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२१ । राज्यभर गाजलेल्या जळगावमधील भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था म्हणजेच बीएचआर घोटाळ्याच्या गुन्ह्यांचा तपास पूर्ण करण्यासाठी पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भोसले यांच्यासह पथकाने सोमवारी जळगावात ४० पेक्षा जास्त साक्षीदार, ठेवीदारांचे जबाब नोंदवून घेतले. साक्षीदारांच्या नावाबाबत पोलिसांनी गोपनीयता बाळगली असून या गुन्ह्याचे दोषारोप तयार करण्यासाठी साक्ष महत्त्वाच्या ठरणार आहेत.

बीएचआर घोटाळ्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासाने गेल्या सहा महिन्यात अनेकांना ताब्यात घेतले आहे. या घोटाळ्यातील सर्वात मोठा मास्टरमाइंड संशयित आरोपी सुनील झंवर याला १० ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली आहे. सध्या तो येरवडा कारागृहात असून, त्याच्या जामीन अर्जावरील दोन्ही पक्षांचे युक्तिवाद पूर्ण झाले आहेत.

झंवरच्या विरोधातील दोषारोपपत्र तयार करण्याचे काम पोलिस करीत आहेत. त्याने साक्षीदारांना धमकावण्याचे प्रकार यापूर्वी केलेले आहेत. त्यामुळे पोलिस काळजीपूर्वक साक्षीदारांचे जबाब घेत आहेत. पोलिस निरीक्षक भाेसले यांनी सोमवारी जिल्ह्यातील काही साक्षीदार, ठेवीदारांना बोलावून ठेवले होते. काहींना पत्राद्वारे कळवण्यात आले हाेते. सोमवारी ४० पेक्षा जास्त साक्षीदार, ठेवीदारांचे जबाब नोंदवून घेतले.

ठेवीदार, साक्षीदारांना झंवर किंवा त्यांच्या नातलगांनी धमक्या देऊ नये यासाठी जबाब घेतलेल्या साक्षीदारांची नावे सध्या गोपनीय ठेवण्यात आली आहे. पोलिसांकडून ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झंवरच्या विरुद्धचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात येईल.

दरम्यान, बीएचआर घाेटाळा प्रकरणात पुण्याचे डेक्कन, शिक्रापूर व आळंदी अशा तीन पोलिस ठाण्यांमध्ये स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. यातील डेक्कन पोलिस ठाण्याच्या गुन्ह्यातच आत्तापर्यंत पोलिसांची कार्यवाही सुरू आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज