⁠ 
मंगळवार, एप्रिल 16, 2024

बीएचआर प्रकरणात अटक केलेल्या १२ जणांना २२ पर्यंत पोलीस कोठडी

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२१ । जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२१ । राज्यभर गाजलेल्या बीएचआर प्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल गुरुवारी १२ जणांना अटक केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या १२ संशयितांपैकी ९ जणांना आज पुणे न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची म्हणजेच २२ जूनपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सरकार पक्षाकडून ॲड. प्रवीण चव्हाण यांनी संशयितांना पोलीस कोठडी मिळावी म्हणून जोरदार युक्तीवाद केला.

बीएचआर घोटाळ्यात प्रकरणात काल गुरुवारी पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव जिल्ह्यासह राज्यभरातील विविध शहरातून १२ जणांना अटक केली होती. न्यायालयात काल तीन जणांना हजर करण्यात आले असता त्यांना २२ पर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती. 

अटक केलेल्यांमध्ये भागवत भंगाळे (जळगाव), छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (जामनेर) याला औरंगाबाद येथून ताब्यात घेण्यात आले. आसिफ मुन्ना तेली (भुसावळ), जयश्री मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), राजेश लोढा (जामनेर), अकोला येथील प्रमोद किसनराव कापसे, प्रितेश चंपालाल जैन (धुळे) अंबादास आबाजी मानकापे (औरंगाबाद) जयश्री अंतिम तोतला (मुंबई), प्रेम रामनारायण कोगटा, प्रमोद किसनराव कापसे (अकोला) यांचा समावेश होता.

या सर्व संशयित आरोपींनी 30 टक्क्याप्रमाणे पावत्या विकत घेतल्या. बीएचआर पतसंस्थेत विशिष्ट प्रकारे संगनमत करून घोटाळा करण्यात आला आहे. तसेच आरोपींनी तीस टक्के प्रमाणे पावत्या विकत घेण्यासाठी परिस्थिती निर्माण केली. आणि यातून ठेवीदारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे सर्व संशयितांना पोलीस कोठडीत देण्यात यावी, अशी मागणी ॲड. प्रवीण चव्हाण यांनी केली.

जळगावातून ताब्यात घेतलेल्या ९ जणांना आज दुपारी पुणे न्यायालयात हजर करण्यात आले असता सर्वांना २२ जून पर्यंत म्हणजेच पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.