भोसरी प्रकरण : मंदाकिनी खडसे ईडी कार्यालयातून बाहेर

जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ नोव्हेंबर २०२१ । भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांची आज ईडीकडून चौकशी करण्यात आली. अडीच तास त्यांची चौकशी करण्यात आली. त्यापूर्वी ३ वेळा मंदाकिनी खडसे यांची भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात चौकशी करण्यात आलेली आहे.

पुण्यातील भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची देखील ईडीकडून चौकशी सुरू आहे. एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे चौकशीसाठी आज ईडी कार्यालयात हजेरी लावली. भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात मंदाकिनी यांचा देखील आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्यांना कोर्टाकडून जरी तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला असला, तरी देखील त्यांनी दर मंगळवारी आणि शुक्रवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावेत असे आदेश त्यांना न्यायालयाकडून देण्यात आलेले आहेत. त्यानूसार मंदाकिनी खडसे या ईडी कार्यालयात हजर झाल्या आहेत.

यावेळी त्यांची अडीच तास चौकशी करण्यात आली. दरम्यान याच प्रकरणात काही दिवसांपूर्वी ईडीकडून एकनाथ खडसे यांची मालमत्ता देखील जप्त करण्यात आली होती. यामध्ये लोणावळा आणि जळगाव इथल्या मालमत्तेचा समावेश आहे.

आरोप झाल्यानंतर गमावावे लागले मंत्रीपद
दरम्यान, एकनाथ खडसे हे फडणवीस सरकारमध्ये महसूल मंत्री असताना त्यांच्यावर पुण्यातील भोसरीमध्ये जमीन घोटाळा केल्याचे आरोप करण्यात आले होते. आरोप झाल्यानंतर खडसे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. चौकशी निपक्षपातीपणे व्हावी म्हणून आपण राजीनामा देत असल्याचे खडसे यांनी त्यावेळी सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात मंत्रीपद गेल्याने खडसे हे पक्षावर नाराज होते, त्यांनी अनेकदा उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली. परंतु खडसे यांची पक्षात योग्य ती दखल घेण्यात न आल्याने अखेर त्यांनी भाजपाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज