खडसेंना सत्र न्यायालयाकडून दिलासा ; भोसरी जमीन प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑक्टोबर २०२१ । पुणे येथील भोसरी जमीन खरेदी प्रकरणात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. खडसे यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

यापूर्वी न्यायालयाकडून मंदाकिनी खडसे यांनादेखील दिलासा मिळालेला आहे. मंदाकिनी खडसे यांची 19 ऑक्टोबर रोजी ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. पुण्यातील भोसरी जमीन कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाने मंदाकिनी खडसेंना अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.

काय आहे प्रकरण?
फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे ३.१ एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप २०१६ मध्ये झाला होता. ३१ कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ ३.७ कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात ईडीने एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाताई आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह इतरांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी याबाबत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात गिरीश दयाराम चौधरी हे ५ जुलै पासून अटकेत आहेत. तर मंदाताई खडसे यांना जामीन मिळाला आहे. याच प्रकरणात आता नाथाभाऊंनाही अंतरीम जामीन मिळाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज