निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाची अवहेलना थांबवा : खा.उन्मेश पाटील

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑगस्ट २०२१ । राज्याच्या साहित्यिक क्षेत्रात अमूल्य योगदान आणि सर्वसामान्य जनतेला आपल्या अपूर्व साहित्य निर्मितीतून जीवन जगण्याचे सार सांगणाऱ्या कवियीत्री, खान्देश कन्या तथा निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांचे स्मारक २०१२ मध्ये सुमारे तीन एकर जागेत असोदा या त्यांच्या जन्मगावी मंजूर करण्यात आले होते. मात्र गेल्या दहा वर्षापासून या स्मारकाच्या कामाला आजपावेतो आवश्यक गती मिळालेली नाही. यामुळे खान्देशासह राज्यातील साहित्यिकांमध्ये नाराजीची वाढली असून खानदेशात बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाबाबत होत असलेली उपेक्षा मनाला वेदना देणारी आहे. याबाबत आपण आग्रही भूमिका घेत स्मारकाची उपेक्षा थांबवावी अशी मागणी खासदार उन्मेश पाटील यांनी मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांचेकडे पत्राद्वारे केली आहे.

खा.उन्मेश पाटील यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांनी निरक्षर असून देखील आपल्या अमोघ वाणीतून जीवन जगण्यासाठी सहाय्यक ठरणार्‍या अमूल्य साहित्याची निर्मिती केली आहे. निसर्गकन्या कवियीत्री बहिणाबाई चौधरी यांचे स्मारक तात्काळ पर्यटन स्थळ विकास कार्यक्रमांतर्गत अथवा ग्राम विकास निधी या योजनेतून लवकरात लवकर होणेबाबत कार्यवाही व्हावी.

सद्यस्थितीत कवियित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारक परिसरात झाडेझुडपे गवत वाढल्याने स्मारकाबाबत होत असलेल्या या उदासिनतेमुळे पंचक्रोशीत व्यवस्थेविरुद्ध प्रचंड चीड निर्माण झाली आहे. सुमारे तीन एकर जागेत होणाऱ्या भव्य स्मारकासाठी पाच कोटी रुपये जिल्हा विकास नियोजन निधीतून खर्च करण्यासंदर्भात तरतूद करण्यात आली होती मात्र नंतर या कामाबाबत अक्षम्य दिरंगाई झाली. राज्यातील साहित्यिकांमध्ये देखील याबाबत वाढती नाराजी पाहता तातडीने आपण बहिणाबाई चौधरी स्मारकाच्या उचित गौरवासाठी कार्यवाही करावी. आपण राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून आग्रही भूमिका घ्यावी अशी या माध्यमातून विनंती करीत आहे. येत्या २४ ऑगस्ट रोजी कवियित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंती असून यापूर्वी आपण याबाबत कार्यवाही कराल. अशी अपेक्षा खासदार
उन्मेश पाटील यांनी व्यक्त केली आहे.

राज्याचे पर्यटनमंत्री ना.आदित्य ठाकरे, राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ, जिल्हयाचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, राज्याचे मुख्य सचिव, जिल्हाधिकारी जळगाव यांना दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -