fbpx

संतापजनक : ३ वर्षीय चिमुकलीसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२१ । शहरातील शनीपेठ परिसरात भाजीपाला विक्री करणाऱ्या एका दाम्पत्याच्या ३ वर्षीय चिमुकलीसोबत २१ वर्षीय तरुणाने अश्लील चाळे करीत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. दरम्यान, प्रकार वेळीच पीडित चिमुकलीच्या आईच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आणि पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले. 

शनीपेठ परिसरात राहणारे एक दांपत्य भाजीपाला विक्री करून आपला उदरनिर्वाह भागवतात. शुक्रवारी ते नेहमीप्रमाणे आपल्या ३ वर्षीय मुलीसह भाजीपाला विक्रीच्या गाडीवर उभे असताना अतिक्रमण विभागाचे वाहन आल्याने त्यांनी मुलीला माजी नगरसेवक स्व.संजय महाजन यांच्या घराच्या ओट्यावर बसविले. भाजीपाला आवरत असताना चिमुकलीच्या आईने मागे वळून पाहिले असता ती हातात मोबाईल घेऊन खेळत असल्याचे दिसले. शेजारी भाजीपाला विक्री करणाऱ्या मुलाने मोबाईल दिला असावा असा समज त्यांना झाला व त्या भाजीपाला उचलू लागल्या. 

काही वेळाने चिमुकलीची आई ओट्यावर ठेवलेला वजनकाटा उचलण्यास गेली असता तिला चिमुकली दिसून आली नाही. आजूबाजूला पाहिले असता ‘मला मम्मीकडे जायचं आहे’ असे जोराने चिमुकली ओरडत असल्याचा आवाज त्यांना ऐकू आला. आवाजाच्या दिशेने पाहिले असता अमोल हरीश जोशी वय-२१ रा.शनीमंदिरामागे, जळगाव हा मुलगा चिमुकलीला घेऊन घराच्या पायऱ्यांवर उभा दिसला. अमोल जोशी हा चिमुकलीसोबत अश्लील चाळे करीत जबरदस्ती करीत होता तर ती ‘मला मम्मीकडे जायचं’ म्हणून ओरडत होती. चिमुकलीची आई धावत गेली असता त्याने मोबाईल घेऊन पळ काढला. 

घडलेल्या प्रकाराने भयभीत होऊन चिमुकलीच्या आईने तात्काळ सर्व प्रकार भाजीपाला विक्रेत्यांना हटविण्यासाठी आलेल्या पोलिसांना सांगितला. पोलिसांनी अमोल जोशीचा शोध घेतला असता तो महाजन यांच्या घराच्या गच्चीवरून आजूबाजूच्या घरांवर उडी मारत असताना त्याला पकडण्यात आले. घटनास्थळी मोठा संतप्त जमाव जमला होता परंतु पोलीस आल्याने त्या तरुणाला पब्लीक मार बसला नाही.

पीडित चिमुकलीच्या आईने फिर्याद दिल्यावरून याप्रकरणी शनीपेठ पोलिसात बाल लैंगिक अपराधांपासून संरक्षण व विनयभंगाच्या कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक यशोदा कानसे करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज