fbpx

हॅलो, मंत्री भुजबळांचा पीए बोलतोय….सुनील झंवरच्या मुलास फोन करून फसवण्याचा प्रयत्न

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२१ । राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांच्या नावे फोन करून धमकावत खंडणी मागणाऱ्याला काही महिन्यांपूर्वीच ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान, आता पुन्हा नवीन प्रकार समोर आला असून मी छगन भुजबळ यांचा पीए बाेलताेय, तर कधी मी पंकज भुजबळ बाेलताेय तर कधी जळगावचे जिल्हाधिकारी बाेलताेय, असे वारंवार फाेन करून मदतीचे आश्वासन देणाऱ्या ताेतया व्यक्तींविराेधात अंबड पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीएचआर पतसंस्थेत गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले सुनील झंवर यांचा मुलगा सूरज झंवर यांना वारंवार असे फाेन येत असल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला.

काही दिवसांपूर्वीच पालकमंत्री छगन भुजबळयांच्या नावाचा वापर करून फसवण्याचा प्रकार उघडकीस आलेला असतानाच आता पुन्हा त्यांच्या आणि माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या नावाचा वापर करीत बीएचआर पतसंस्थेच्या प्रकरणात अटकेत असलेले सुनील झंवर यांच्या मुलाला फाेन करून मदतीसाठी आश्वासन देत त्याची फसवणूक केल्याचा प्रकार समाेर आला आहे. अंबड पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले सुनिल झंवर यांचा मुलगा सूरज झंवर पालकमंत्री छगन भुजबळ, पंकज भुजबळ यांच्या नावाने फोन करण्यात आला. तसेच, जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या नावाने देखील आपणांस मदतीसाठी फाेन आल्याचे त्यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे. या प्रकरणाची सखाेल चौकशी करुन शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या प्रकरणात जळगाव येथील उद्याेजक तथा माजी पालकमंत्र्यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सुनिल झंवर यांच्यावर पुण्यातील डेक्कन पोलिसांत गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात सुनिल झंवर यांना ७ सप्टेंबर रोजी नाशकातूनच अटक करण्यात आली आहे. त्यांचा मुलगा सूरज झंवर यांचीही या प्रकरणात चाैकशी झाली असून ताे उच्च न्यायालयात कामानिमित्त गेला असतांना त्यास ९४२३४२११११ क्रमांकावरुन फोन आला. मी पंकज भुजबळ बोलत असून ८ सप्टेंबर २०२१ रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात मला येऊन भेटा, असे सांगत फोन बंद करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरुन फोन करुन मी भुजबळांचा पीए बोलत असल्याचे सांगून तुम्ही जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले नाही.

कलेक्टर साहेबांचा पीए वाट पाहत असल्याचे सांगितले. त्यानंतर काही वेळात जळगाव येथील एका लँण्डलाइन क्रमांकावरुन ‘मी अभिजित राऊत (जळगाव कलेक्टर) बोलतोय…तुमचे काही काम आहे का? अशी विचारणा केली गेली. मी नाही म्हटल्यावर त्यांनी फोन ठेवला. या प्रकारानंतर सूरज झंवर यांनी जिल्हाधिकारी राऊत यांची भेट घेतली. त्यांनाही या प्रकारासंदर्भात काहीच माहिती नव्हती. त्याचवेळी नाशिकवरुन पंकज भुजबळ यांचा फोन आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या पीएने सांगितले. त्यानंतर पुन्हा तिसऱ्या मोबाइल क्रमांकावरून पंकज भुजबळ बोलत असल्याचा फोन आला. त्यांनी लँण्डलाइनवरुन फोन करण्यास सांगितले.

काम करून देण्याची ऑफर
सूरज झंवर यांनी जळगाव येथील मित्राच्या लँण्डलाइनवरुन फोन लावला असता, स्वतः छगन भुजबळ बाेलत असल्याचे बतावणी करीत माझा फोन आल्याचे कोणाला सांगणार नसल्याचे वचन मागितले. त्याचवेळी माझे एक काम करुन द्या, मी तुमचे माेठे काम करुन देतो, अशी चक्क ऑफरच भुजबळांनी दिल्याचे म्हटले आहे. तुम्हाला समीर व पंकज हे दाेघे मदत करतील, तुम्ही त्यांच्या संपर्कात राहा असे म्हणत फाेन बंद करण्यात आला. असेही झंवर यांनी पाेलिसांना सांगितले.

चौकशी करुन गुन्हा दाखल
मोबाईलवर आलेले ऑडिओ क्लिपिंग पालकमंत्री भुजबळ, समीर भुजबळ यांना ऐकवल्या. या दाेघांच्या व जिल्हाधिकारी राऊत यांच्याही अावाजाशी फाेन करणाऱ्या व्यक्तीचा आवाज जुळत नसल्याचे लक्षात आले. त्यावरून नाशिक पोलिसांत १८ सप्टेंबर रोजी दाखल अर्जावर चौकशी करून पालकमंत्र्यांसह पंकज भुजबळ व जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे निंबाळकर यांनी सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज