जळगावात मजूर कुटुंबावर प्राणघातक हल्ला, एक गंभीर

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२१ । शहरातील प्रिंपाळा परिसरातील स्मशानभूमी परिसरात शुक्रवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास किरकोळ वादात मजुरी करणाऱ्या कुटुंबाला जबर मारहाण करत प्राणघातक हल्ला करण्यात आला. या मारहाणीत ५२ वर्षीय इसमाची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

पिंप्राळा मढी चौक ते स्मशानभूमी परिसरात शुक्रवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास मजुरी करणारे संतोष मकरंद चव्हाण (वय ५२ वर्षे) यांच्यावर रितेश उर्फ गोल्या मिलिंद जाधव याच्यासह दोघांनी किरकोळ जुन्या वादातून हल्ला केला. हल्लेखोरांनी लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार केल्याने चव्हाण यांच्या डोक्याला जबर खोलवर जखम झाली आहे. तसेच डावा पाय आणि उजव्या हाताचे मनगट फ्रेक्चर झाले आहे.

संतोष चव्हाण यांना मारहाण होत असताना त्यांची पत्नी व मुले यांच्यावर देखील हल्लेखोरांनी हल्ला केला असता ते जीव वाचविण्यासाठी घटनास्थळावरून पळून गेले होते.

रितेश उर्फ गोल्या मिलिंद जाधव व त्याच्या साथीदाराने या कुटुंबावर हा हल्ला केला असल्याचे जखमी संतोष व त्याच्या पत्नीने सांगितले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. याबाबत घटनेची नोंद करण्याचे काम सुरु असून हल्लेखोर रितेश हा काही दिवसांपूर्वीच कारागृहातून बाहेर आल्याचे समजते. चव्हाण यांच्या जावयालाही मारहाण करण्यात आली आहे.

चव्हाण कुटुंब मुळचे खारी, ता.बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश येथील रहिवासी आहे. जळगाव आणि परिसरात बांधकाम ठिकाणी मजुरी करून ते उदरनिर्वाह करतात. १२ वर्षांपासून ते पिंप्राळा येथे राहतात. चव्हाण हे स्वभावाने नम्र असून परिसरात ते “देखोदादा” नावाने देखील ओळखले जातात. रिक्षाचालक निलेश ठाकूर यांनी चव्हाण यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -