जळगाव लाईव्ह न्यूज । १३ डिसेंबर २०२४ । जळगाव महानगरपालिकेतील नगररचना विभागातील लाच प्रकरणात आयुक्तांसह सहायक संचालकांचे नाव आल्याने राज्य शासनाकडून तातडीने दखल घेण्यात आली. नगररचना विभागाच्या सहायक संचालकपदाचा अतिरिक्त असलेला कार्यभार दिघेश तायडे यांच्याकडून काढून घेण्यात आला असून नगररचनाकार अमोल पाटील यांच्याकडे हा कार्यभार सोपविण्यात आला आहे. सहसचिव सुबराव शिंदे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
बांधकाम परवानगी व भोगवटा प्रमारपत्रासाठी लाचेची मागणी केल्यानंतर नगररचना विभागातील भ्रष्ट कारभार उजेडात आला आहे. या गुन्ह्यात अटकेत असलेला मनपाचा रचना सहायक मनोज वन्नेरेची दोन दिवसांची पोलिस कोठडी गुरूवारी संपली. न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करत जामीन मंजूर करण्यात आला. त्यामुळे वन्नेरे पोलिसांच्या जाळ्यातून बाहेर पडला असला तरी नगररचना सहायक संचालक दिगेश तायडे यांची राज्य शासनानेच उचलबांगडी केली आहे.
दरम्यान, मनोज वन्नेरे याला जामीन मंजूर झाल्याने तो कामकाज करीत असलेला कक्ष व कपाटाचे सील उघडण्यात आले. गुरुवारी एसीबीचे उपअधीक्षक योगेश ठाकूर, उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांचे पथक सायंकाळी महापालिकेत धडकले त्यांनी सर्वात आधी सील उघडले. त्यानंतर रचनाकार अमोल पाटील यांच्या दालनात जाऊन त्यांनी या विभागातील कामकाज कसे चालते याची माहिती घेतली. प्रकरण दाखल झाल्यानंतर ते सर्वात आधी कोणाकडे जाते. त्याची पद्धत कशी व अंतिम मंजुरी, शासकीय चलन याची माहिती जाणून घेताना लाच प्रकरणात नेमके कसे झाले याचीही माहिती घेतली. काही प्रकरणे अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून मंजूर केली जात असल्याचे समोर आले.