महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या सल्लागार समिती अध्यक्षपदी अशोक जैन

जळगाव लाईव्ह न्यूज | २४ ऑक्टोबर २०२१ । महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेची विशेष वार्षिक सर्वसाधारण सभा पुणे पीवायसी जिमखाना येथे रविवार दि.२४ रोजी पार पडली. सभेत झालेल्या ठरावा प्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर स्पर्धा आयोजन समितीच्या सचिवपदी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार फारुक शेख अब्दुल्ला यांची व आरबीटर (पंच) समितीच्या सचिवपदी जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे संचालक प्रवीण ठाकरे यांची निवड करण्यात आली. संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. परिणय फुके यांनी ही घोषणा केली.

महाराष्ट्रात कार्यरत असलेली महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यामध्ये मागील तीन वर्षापूर्वी अखील मराठी बुद्धिबळ संघटनाही स्थापन झाली होती व त्यामुळे दोघी संघटनांमध्ये वाद निर्माण होऊन प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेले होते. दरम्यान, ऑल इंडिया चेस फेडरेशनच्या माध्यमाने अखिल मराठी बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष डॉ. परिणय फुके यांनी अखिल मराठी बुद्धिबळ संघटनेचे महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेत विलीनीकरण करून महाराष्ट्र राज्यात फक्त महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना ही एकमेव राज्य संघटना कार्यरत असल्याचे घोषित केले होते. म्हणून त्यांची महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली होती.

पुणे येथे महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेची विशेष वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या बैठकीत बारा ठराव पारित करण्यात आले. त्यात महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या घटनेत बदल करण्यात येऊन त्याला मान्यता देण्यात आली, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेने दिलेल्या चेस इन एव्हरी वन या कार्यक्रमाला मान्यता देण्यात आली, १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२१ च्या हिशोबाला मान्यता देण्यात आली. विविध बुद्धिबळ विकासाच्या कामाला मान्यता देण्यात आली, त्यात प्रामुख्याने महाराष्ट्र चेस लीग स्पर्धेचे आयोजन, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील प्रत्यक्ष टेबलावरील स्पर्धेचे आयोजन, चेस इन स्कूल कार्यक्रम राबवण्यासाठीचे धोरण निश्चित केले. विविध समित्या स्थापन केल्या त्यात प्रामुख्याने सल्लागार समिती, स्पर्धा आयोजन समिती, चेस इन स्कूल समिती, आर्बिटर समिती, फंड राईस कमिटी, तक्रार निवारण समिती, स्थापन करण्यात आल्या. कोणत्याही जिल्ह्याने अथवा संघटनेने खेळ व खेळाडूसाठी कोर्टाची पायरी चढू नये, असे सुद्धा सर्वानुमते ठरले.

यांनी केले मार्गदर्शन
सभेत अशोक जैन व सिद्धार्थ मयूर यांनी ऑनलाईन तर अध्यक्ष आमदार डॉ. परिणय फुके, कार्याध्यक्ष सिद्धार्थ मयूर वरिष्ठ उपाध्यक्ष अभिजीत कुंटे, सचिव निरंजन गोडबोले, उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, गिरीश चितळे, पी.बी. भिलारे, खजिनदार फारुक शेख, सहसचिव हेमेंद्र पटेल, यशवंत बापट, अंकुश रक्ताळे, निनाद पेंडणेकर, धुळ्याचे रतन लीगाडे, कोल्हापूरचे भारत चौगुले, विधी सल्लागार ऍड.अनिल ताडे यांनी प्रत्यक्ष सभेत मार्गदर्शन केले.

बुद्धिबळ विकासासाठी तीस लाख रुपये
महाराष्ट्र राज्यातील बुद्धिबळ खेळाचा प्रचार व प्रसार तसेच खेळाडूंच्या सोयीसवलतीसाठी कार्याध्यक्ष सिद्धार्थ मयुर यांनी तीस लाख रुपये जमा करण्याचा प्रस्ताव सादर केला. त्यात सर्वप्रथम अशोक जैन यांनी पाच लाख रुपये, सिद्धार्थ मयूर व गिरीश चितळे यांनी प्रत्येकी पाच लाख रुपयांची घोषणा केली. धुळ्याचे रतन लिगाडे यांनी सुद्धा ५१ हजार रुपये या विकास कामासाठी घोषित केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज