पिस्तूल घेऊन दहशत माजविणाऱ्यास जळगाव शहरातून अटक

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२१। जळगाव शहरातील गेंदालाल मिल भागात गावठी बनावटीचे पिस्तूल घेऊन दहशत माजविणाऱ्या अट्टल गुन्हेगारास रविवार दि.१७ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक करण्यात आली असून याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव रेल्वे स्टेशनमागील गेंदालाल मिल भागात युनूस सलीम पटेल उर्फ सद्दाम हा गावठी बनावटीचे पिस्तूल घेऊन दहशत माजवीत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोहेकॉ. विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अकरम शेख, नितीन बाविस्कर, प्रितमकुमार पाटील, राहुल पाटील, राहुल बैसाणे आदींच्या पथकाने गेंदालाल मिल भागात जाऊन त्याचा शोध घेतला. यावेळी युनूस पटेल हा रेल्वे स्टेशनमागील रिक्षा स्टॉप, एक्सीस बँकेच्या एटीएमसमोरील एका पानटपरीवर उभा असल्याचे दिसून आले. पथकाने त्याला लागलीच ताब्यात घेतले. त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या कमरेच्या डाव्या बाजूला पॅन्टमध्ये खोचलेले गावठी बनावटीचे पिस्तूल व त्यात एक जिवंत काडतूस आढळून आले. याप्रकरणी युनूस सलीम पटेल उर्फ सद्दाम (वय-३०, रा. गेंदालाल मिल) यांच्यावर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज