प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२१ । प्रधानमंत्री पीक विमा योजनेत रब्बी हंगाम २०२१-२२ मध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतक-यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.

केंद्र शासनाने रब्बी हंगाम २०२१-२२ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना जळगाव जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतला असून अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिके घेणारे कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार व तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी न होण्यासाठी कर्ज घेतलेल्या अधिसुचित पिकांकरिता नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या ७ दिवस आधीपर्यंत संबधित बँकेस त्याअनुषंगाने विमा हप्ता कपात न करणेबाबत कळविणे आवश्यक राहील. जे कर्जदार शेतकरी विहित मुदतीत सहभागी न होण्यासाठी संबधित बँकेस कळविणार नाहीत असे शेतकरी योजनेत सहभागी आहेत असे गृहित धरण्यात येईल व या शेतकऱ्यांचा विमा हप्ता विहित पध्दतीने कर्ज खात्यातून वजा करण्यात येईल.

बागायती गहूसाठी विमा संरक्षित रक्कम ३० हजार रुपये असून शेतकऱ्याने भरावयाची विमा हप्ता रक्कम ४५० रुपये प्रति हेक्टर इतकी आहे. विमा हप्ता भरण्याची शेवटची मुदत १५ डिसेंबर आहे. बागायती व जिरायती ज्वारीसाठी विमा संरक्षित रक्कम २४ हजार रुपये तर शेतकऱ्याने भरावयाची विमा संरक्षित रक्कम ३६० रुपये प्रति हेक्टर, विमा हप्ता भरण्याची शेवटची मुदत ३० नोव्हेंबर असणार आहे. हरभरा विमा संरक्षित रक्कम २७ हजार रुपये असून शेतकऱ्याने भरावयाची विमा हप्ता रक्कम ४०५ रुपये प्रति हेक्टर इतकी आहे. विमा हप्ता भरण्याची शेवटची मुदत १५ डिसेंबर आहे. रब्बी कांदासाठी विमा संरक्षित रक्कम ६० हजार रुपये तर शेतकऱ्याने भरावयाची विमा हप्ता रक्कम ३ हजार रुपये प्रति हेक्टर इतकी आहे. विमा हप्ता भरण्याची शेवटची मुदत १५ डिसेंबर आहे. उन्हाळी भुईमुगसाठी विमा संरक्षित रक्कम ३५ हजार रुपये असून शेतकऱ्याने भरावयाची विमा हप्ता रक्कम ५२५ रुपये प्रति हेक्टर, विमा हप्ता भरण्याची शेवटची मुदत ३१ मार्च २०२२ असणार आहे.

जिल्हयात पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्यात येत असुन नैसर्गिक आपत्तींपासून नुकसान टाळण्यासाठी पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, शेतकऱ्यांनी दि.१५ डिसेंबर या अंतिम मुदतीची वाट न पाहता आजपासुनच पिकाचा विमा काढण्यात यावा, जेणेकरुन शेवटच्या दिवशी घाई होणार नाही. अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील नजीकच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा, सर्व राष्ट्रीयकृत बँक, आपले सरकार सेवा केंद्र, तालुका कृषि अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकुर यांनी केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज