जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२२ । येथील चोपडा शहरातील एका महिलेला दहा दिवसांपूर्वी चक्क “तिळे” म्हणजे तीन मुले जन्माला आले होते. डॉक्टरांनी अत्यंत गुंतागुंतीची असलेली शस्त्रक्रिया करून महिलेची सुखरूप प्रसूती केली. रविवारी दि. १४ ऑगस्ट रोजी महिलेसह तिन्ही बाळांना अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते साडी, फळे, शक्तिवर्धक औषधे देऊन रुग्णालयातून यशस्वीपणे निरोप देण्यात आला. यावेळी महिलेच्या तिन्ही बाळांना केशरी, पांढरा, हिरव्या रंगाचे कपडे घालून “तिरंगा” सादरीकरण करून अनोख्या एकात्मतेचा संदेश दिला.
चोपडा येथील महिलेला प्रसूतीसाठी दहा दिवसांपूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. महिलेची प्रकृती पाहता, अत्यंत गुंतागुंतीची होती. डॉक्टरांनी वैद्यकीय कौशल्य वापरून महिलेची यशस्वी शस्त्रक्रिया करून तिन्ही सुमारे २ किलो वजन असणाऱ्या बाळांना सुखरूपपणे बाहेर काढले.
महिलेची प्रकृती सुधारल्यानंतर तसेच बाळांची प्रकृती उत्तम झाल्यावर रविवारी दि. १४ ऑगस्ट रोजी सकाळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते महिलेला साडी, फळे, शक्तिवर्धक औषधी देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी स्त्री रोग व प्रसूतिशास्त्र विभाग प्रमुख आणि सहकारी डॉक्टरांचे कौतुक केले.
प्रसंगी महिलेच्या खाटेच्या मागे तिरंगा झेंड्याची निर्मिती तयार करून तसेच तिन्ही बाळांना अनुक्रमे केशरी, पांढरा, हिरवा ड्रेस घालून तिरंगी सादरीकरण केले. यावेळी विभागात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चैतन्यमयी वातावरण निर्माण झाले होते. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, मुख्य अधिसेविका प्रणिता गायकवाड, विभाग प्रमुख डॉ. संजय बनसोडे, डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. प्रदीप लोखंडे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी विभागातील डॉ. सोनाली मुपाडे, डॉ. हेमंत पाटील, डॉ. खुशाली राठोड, डॉ. श्रद्धा पाटील, डॉ. राजश्री येसगे, डॉ. निकिता सूर्यवंशी, डॉ. मोनिका येरमवार, डॉ. प्रणिता खरात, डॉ. पूजा बुजाडे, इन्चार्ज सिस्टर लता सावळे, सुवर्णा कांगाणे, भारती महाजन, संदीप सोनवणे, रेखा मोरे, कमल पवार, यांच्यासह जनसंपर्क सहायक विश्वजीत चौधरी उपस्थित होते.