fbpx

आमदारांनी पाचोरा व भडगाव तालुक्यातील रखडलेले प्रश्न अधिवेशनात मांडावे – भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे 

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२१ । भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी पाचोरा व भडगाव तालुक्यातील रखडलेल्या समस्यांबाबत शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांना पत्रकाद्वारे  कानटिचक्या दिल्या. ते म्हणाले कि,  आमदार घेऊन सात वर्षात पाटील यांनी  विधानसभेत चकार शब्द देखील काढला नसुन ते या समस्यांवर फक्त स्थानिक स्तरावर पत्रकार परिषदा घेऊन व चमकोगिरी करत फक्त समस्यांचे राजकारण करत आहेत.  पाचोरा व भडगाव तालुक्यातील जनतेला प्रत्येक निवडणुकीत या सर्व समस्यांबाबत आश्वासित करून निवडणुका जिंकण्यासाठी त्यांच्या भावनांशी खेळत असतात. परंतु प्रत्यक्षात या समस्यांबाबत त्यांनी आजपावतो विधानभवनात चकार शब्द काढला नसून त्यांना होऊघातलेल्या अधिवेशनाआधी आठवण म्हणून भाजपाचे अमोल शिंदे यांनी स्मरणपत्रिका काढून खालील समस्यांची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

ज्यात ते म्हणाले आहे कि ,

गेल्या दोन महिन्यापूर्वी मागील रब्बी हंगामाचचा शेतमाल विक्रीसाठी पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतीसंघाकडून ज्वारीसाठी जवळपास २००० शेतकऱ्यांनी व मक्यासाठी १३०० शेतकऱ्यांनी आणि गहू साठी २० शेतकऱ्यांनी नावनोंदणी केली होती.दोन महिने होऊन देखील खरेदी होत नव्हती त्यासाठी भारतीय जनता पार्टी च्या प्रयत्नाने प्रत्यक्षात २२ जून रोजी खरेदीला सुरुवात झाली.परंतु त्यातही पाचोरा तालुक्यातून फक्त ३९ शेतकऱ्यांची व भडगाव तालुक्यातील ८३ शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी करून खरेदी बंद केली गेली. आता उर्वरित शेतकऱ्यांच्या शेतमालाचे काय ? व कधी खरेदी होईल याबाबत अधिवेशनात आमदार महोदयांनी स्वतःच्या सरकारला जाब विचारावा व शेतकरी बांधवांचा हा ज्वलंत प्रश्न मार्गी लावावा.

२) महावितरणकडून अजूनही शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज कनेक्शन तोडणी सुरूच आहे.व शेतकऱ्यांचे नादुरुस्त झालेले ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याशिवाय दिले जात नाही.त्यासाठी आमदारांनी सत्ताधारी पक्षात असून देखील शेतकऱ्यांच्या समस्यांचे राजकारण करत नौटंकी आंदोलन केले होते.तरी देखील शेतकर्‍यांची वीज तोडणी थांबलेली नाही. तरी आमदारांनी सदर विषय अधिवेशनात लावून ठेवावा त्यांच्या पक्षाचे मुख्यमंत्री व त्यांच्याच सरकारमधील ऊर्जामंत्री असल्याने त्यांनी तसे आदेश काढण्यासाठी सरकारला भाग पाडावे.

३) भडगाव शहरात अनिमित होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गिरणा नदीवर बंधारा बांधून जलशुद्धीकरण केंद्र स्थापन करून स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा व्हावा याची मागणी प्रामुख्याने करावी जेणेकरून दरवर्षी भडगाव येथील जनतेचे होणारे हाल कमी होतील.

४) भडगाव येथील जनतेने नेहमी मागणी लावून ठेवलेला व आमदारांनी देखील आश्वासित केलेला मटन मार्केट ते भडगाव पेठ पुलाचे आजपावेतो काम सुरु झाले नसून भडगाव येथील जनतेला दैनंदिन जीवनात याचा त्रास सहन करावा लागत आहे.तरी आमदार महोदयांनी अधिवेशनात या विषयावर त्वरित काम सुरू होणे संदर्भात मागणी करून हा विषय मार्गी लावावा.

५) पाचोरा-भडगाव तालुक्यात एम.आय.डी.सी.(औद्योगिक वसाहत) विकसित करण्यासंदर्भात फक्त आमदार महोदयांनी वल्गना केल्या असून प्रत्यक्षात कामाची सुरुवात कुठेच झालेली दिसून येत नाही. तरी अधिवेशनात सदर विषयावर चर्चा व्हावी.

६) मैत्रेय कंपनी मध्ये ग्राहकांनी गुंतवणूक केलेले पैसे त्यांना त्वरित परत मिळवुन देण्यासाठी आमदार झाल्यावर सहा महिन्यात पैसे मिळवुन देईल असे त्यावेळी गुंतवणुक दारांना आश्वासित केले होते.यासाठी आमदार फक्त स्थानिक स्तरावर बैठका घेऊन जनतेला खोटी आश्वासने देतात यासंदर्भात अधिवेशनात आमदारांनी विशेष चर्चा करून हा देखील विषय मार्गी लावावा.

७) कोरोना काळात आमदार महाशयांनी पाचोरा व भडगाव येथे पंधरा दिवसात स्वतंत्र ऑक्सीजन प्लांट कार्यान्वित करू व लवकरांत-लवकरात जिल्हा उप-रुग्णालयाचे काम सुरू करू असे सांगून जागेची पाहणी देखील केली परंतु अजून पर्यंत ऑक्सीजन प्लांट व जिल्हा उप-रुग्णालय कागदावरच आहे.तरी आमदार महोदयांनी तिसऱ्या लाटेचा धोका बघता या संदर्भात देखील अधिवेशनात आवाज उठवावा.

८) कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका बघता डेल्टा विषाणूचा संसर्ग लक्षात घेऊन पाचोरा व भडगाव मधील खिळखिळी झालेली आरोग्य व्यवस्था सुरळीत करून योग्य त्या उपाययोजना वेळे आधी मतदार संघात कशा कार्यान्वित करता येतील यावर चर्चा करून मागणी करावी.

या वरील सर्व पाचोरा व भडगाव तालुक्यातील समस्याबाबत आमदार महाशय या वेळी नक्कीच अधिवेशनात परखडपणे आपल्या सरकारला जाब विचारून सदर समस्या मांडतील अशी अपेक्षा भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज