डंपर, बेशिस्त हॉकर्स, वाहन चालकांमुळे अडकली रुग्णवाहिका

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जानेवारी २०२२ । शहरातील मुख्य रस्त्यावर प्रामुख्याने टॉवर चौक ते भिलपुरा चौक, सुभाष चौक परिसरात मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. रविवारी अशाच एका प्रसंगात रुग्णवाहिका अडकली होती. रस्त्यावर बेशिस्तपणे उभे राहणारे हॉकर्स, बेशिस्त वाहनचालक आणि डंपरमुळे रुग्णाला उपचार मिळण्यास उशीर झाला.

जळगाव शहरातील काही रस्त्यांवर नेहमीच वाहतूक ठप्प होत असते. विशेषतः बाजारपेठेचा भाग असलेल्या टॉवर चौक, घाणेकर चौक, सुभाष चौक, चौबे शाळा, सराफ बाजार, फळ गल्ली, दाणा बाजार वाहतूक ठप्प होते. गेल्या काही दिवसांपासून ममुराबाद रेल्वे पुलाच्या खाली आणि दोन्ही बाजूला देखील वाहतूक ठप्प होत आहे. दोन दिवसांपूर्वीच एक रुग्णवाहिका त्याठिकाणी रहदारी ठप्प असल्याने अडकली होती. ते उदाहरण ताजे असतानाच आज पुन्हा एक रुग्णवाहिका सुभाषचौकात अडकली होती.

सुभाष चौक ते चौबे शाळा, बळीराम मंदिरापर्यंत दोन्ही बाजूला भाजीपाला विक्रेते आणि हॉकर्स आपले व्यवसाय थाटून बसलेले असतात. बऱ्याच वेळा ते रस्त्याच्या एका कडेला उभे न राहता रस्त्यावर येत असल्याने नागरिकांना त्रास होत असतो. रविवार असल्याने सुभाष चौकात फारशी वर्दळ नसली तरी बेशिस्त हॉकर्स, वाहनचालकांचा फटका रुग्णवाहिकेला बसला. सुभाष चौकाकडून चौबे शाळेकडे जात असलेल्या रुग्णवाहिकेच्या पुढे चालत असलेला एक डंपर रहदारीत अडकला त्यामुळे रुग्णवाहिका देखील त्याठिकाणी अडकली होती. काही वेळाने नागरिकांनीच मार्ग करून दिल्याने रुग्णवाहिका पुढे मार्गस्थ झाली.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -