fbpx

तटबंदी शहर अमळनेर : मंगळ ग्रह मंदिर, सखाराम महाराज, सानेगुरुजी पुण्याई

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२१ । जळगाव शहरापासून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर असलेले अमळनेर देशभर प्रसिद्ध आहे ते मंगळदेव ग्रह मंदिरामुळेच.. देशातील दुसरे मंगळग्रह मंदिर अमळनेरला आहे. संत सखाराम महाराजांची पुण्याई, सानेगुरुजींचे प्रदीर्घ वास्तव्य, शहराच्या एका बाजूला बोरी नदी, नदीकाठी असलेली तटबंदी आणि शहरात उभारलेले उंच दरवाजे आणि लाकडी इमारती सहज आपले लक्ष वेधून घेतात.

जळगाव जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून जळगाव जिल्ह्याचे कॉफी टेबल बुक प्रकाशित करण्यात आलं होते. जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी आम्हाला हे पुस्तक उपलब्ध करून दिले आहे. याच पुस्तकाचा आधार घेत जळगाव लाईव्ह पर्यटन विशेष मालिका सुरु करण्यात आली आहे.

mi advt

अमळनेर शहर हे जळगाव पासून ५६ कि.मी. अंतरावर आहे. बोरी नदीने शहराचे दोन भाग केले असून प्रमुख रस्त्याच्या दुतर्फा दुमजली, तिमजली सुंदर लाकडीकाम केलेल्या इमारती आहेत. गावापासून दीड किलोमीटरवर दक्षिणेस खार्टेश्वर महादेव मंदिर असून मंदिराच्या मार्गावर एक सतीचा खांब आहे. पूर्वेस बोरी नदीकाठी रेल्वे पुलाजवळ वरुणेश्वर महादेव मंदिर आहे. मंदिराशेजारी एक तलाव आहे. येथून अडीच किलोमीटरवर एका टेकडीवर अंब ऋषीचे देवालय असून त्याच्या पायऱ्यांवर आरपार भुयार आहे. आषाढी द्वादशीला येथे मोठी यात्रा भरते. पश्चिमेस प्रतापशेठ यांनी बांधलेले भव्य व कलाकुसरयुक्त राम मंदिर आहे. याशिवाय गावात शनि व मंगळ ग्रह यांची मंदिरे आहेत. दादावाडीत एक सुंदर कलात्मक जैन मंदिर आहे.

सुमारे २०० वर्षांपूर्वी झालेल्या संत सखाराम महाराज यांच्या स्मरणार्थ बोरीनदीच्या काठावर सुंदर समाधी मंदिर बांधले आहे. येथे वैशाख शुद्ध एकादशीपासून पौर्णिमपर्यंत मोठी यात्रा भरते. संत सखाराम महाराजांनी सुमारे १८१६ मध्ये स्थापना केलेले विठ्ठल मंदिरही येथे आहे. येथील विठ्ठल मंदिर व वाळवंटात भरणारी यात्रा या दोन गोष्टींमुळे अमळनेरला ‘प्रतिपंढरपूर’ असेही म्हणतात.

अमळनेर शहराचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे येथे १९१६ मध्ये स्थापन झालेले तत्त्वज्ञान मंदिर, साने गुरुर्जीचे येथे दीर्घकाळ वास्तव्य असल्यामुळे खान्देशात त्यांना मानणारा मोठा शिष्यवर्ग आहे. येथील प्रताप हायस्कूलमध्ये ते अध्यापक होते. कवी माधव त्र्यंबक पटवर्धन तथा माधव जूलियन हेदेखील येथे बरीच वर्षे शिक्षक होते. ‘विरहतरंग’ हा काव्यसंग्रह त्यांनी येथेच रचला. इ. स. १९५२ मध्ये अमळनेरला मराठी साहित्य संमेलनही भरले होते. येथील साने गुरुजी ग्रंथालय (व्हिक्टोरिया ज्युबिली लायब्ररी) १८७२ मध्ये स्थापन झाले असून १९५२ मध्ये ग्रंथालयाच्या इमारतीत मराठी वाङ्मय मंडळाचे कार्यालय उघडण्यात आले.

अमळनेर येथे पूर्वी एक नगरदुर्ग होता; म्हणजे शहराला तटबंदी व बुरूज बांधून संरक्षित केलेले होते. या शहराच्या एका बाजूस बोरी नदीचे पात्र असल्यामुळे नैसर्गिक संरक्षण होते. ते भक्कम
करण्यासाठी नदीच्या बाजूसही तटबंदी व बुरूज बांधण्यात आले होते. शहराच्या उरलेल्या तीन बाजूस ३ दरवाजे व २० फुटी तटबंदी होती.

इ. स. १८१८ मध्ये हा किल्ला पेशव्यांचे प्रतिनिधी माधवराव यांच्या ताब्यात होता. पेशव्यांच्या आज्ञेप्रमाणे माधवरावांनी हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात देण्याचे ठरविले, पण किल्ल्याचा जमादार अली व त्याच्या हाताखालची अरब फलटण यांनी या गोष्टीला विरोध केला. ब्रिटिश कर्नल हस्कीन्सन मालेगावहून भिल्ल बटालियन घेऊन अमळनेरवर चालून आला. त्याने नदीच्या पूर्वेकडून किल्ल्यांवर तोफांचा मारा केला, अली जमादार व त्याच्या सैन्याने प्रयत्नांची शर्थ केली; पण ब्रिटिशांनी चारही बाजूंनी त्यांची कोंडी केली होती. दक्षिणेकडील बहादरपूर किल्ल्यावरून येणारी रसद व दारूगोळा ब्रिटिशांनी ताब्यात घेतल्यामुळे बंद झाली. त्यामुळे अली जमादार व त्याच्या सैन्याने नदीपात्रातून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला; पण ते सर्वजण इंग्रजांचे कैदी बनले.

अमळनेर शहरातच किल्ल्याचा २० फूट उंच बुलंद दरवाजा व त्या बाजूचे भक्कम बुरूज उभे आहेत. या दरवाजाखालून जाणारा रस्ता बोरी नदीकाठावरील संत सखाराम महाराजांच्या समाधी मंदिराकडे जातो. या बाजूने बोरी नदीपात्रात उतरल्यावर किल्ल्याची तटबंदी व त्यावरील घरे दृष्टीस पडतात. उजव्या हाताला एक बुरूज दिसतो. नदीवरून प्रवेशद्वाराकडे परत येताना रस्त्यात देशमुखांचे लाकडी नक्षीकाम असलेले सुंदर दुमजली घर आहे. तसेच नवीन बांधण्यात आलेले मंगळग्रह मंदिर हेदेखील प्रेक्षणीय स्थळ आहे. औद्योगिकदृष्ट्या विकसित झालेल्या या शहरात प्रतापशेठ यांनी १९०६ मध्ये स्थापन केलेली प्रताप कापड गिरणी, १९४६ मध्ये स्थापन झालेला वनस्पती तेलापासून तूप बनविण्याचा वेस्टर्न इंडिया व्हेजिटेबल प्रॉडक्ट्स कारखाना इत्यादी अनेक कारखाने शहराच्या वैभवात भर घालतात.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज