माजी विद्यार्थी, शिक्षकांनी २१ वर्षानंतर एकत्र येत साजरा केला ‘सोनेरी क्षण’

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२१ । मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथील श्री एस.बी. चौधरी हायस्कूलमध्ये ‘सोनेरी क्षण-२०२१’ हा गुरु-शिष्य मेळावा साजरा करण्यात आला. ह्या मेळाव्यासाठी २१ वर्षानंतर सर्व माजी विद्यार्थी, शिक्षक व निवृत्त शिक्षक एकत्र जमले होते.

कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक त्र्यंबक सोनजी चौधरी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून व शाळेचे माजी पर्यवेक्षक आर.एल. लढे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस.डी. पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यवस्थापन समितीचे विनायक पांडूरंग चौधरी, अतुल युवराज पाटील, आर.एल. लढे, एस.जी. जंगले, हरी महाजन, के.व्ही. चौधरी, सूर्यभान कोळी, जगन्नाथ श्रीखंडे, सुरेश चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी कृतज्ञता म्हणून माजी विद्यार्थ्यांकडून कार्यरत व निवृत्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा स्मृतीचिन्ह, शालमी, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी मनोगत व्यक्त करताना लॉस एंजिलीस (कॅलीफोर्निया) येथील सॉफ्टवेअर इंजिनिअर व माजी विद्यार्थी उमाकांत पाटील यांनी त्यांच्या आयुष्यात शिक्षकांनी दिलेल्या मार्गदर्शनाने यशाची कशी भरारी घेतली याची यशोगाथा मांडली. माजी विद्यार्थी व ठाणे येथील पोलीस उपनिरिक्षक सुपडू बेलदार यांनी संघर्षातून शिक्षण घेत प्रशासकीय सेवेची परीक्षा उत्तीर्ण करून पोलीस उपनिरिक्षक पदावर कसे पोहचले हा अनुभव कथन केला. ठाणे येथील नवोदय विद्यालयाच्या रिसोर्स टिचर शोभा सोनार यांनी आंतरराष्ट्रिय स्तरावर वैज्ञानिक उपकरणे कशी सादर करून ख्याती मिळविली याबाबतचे अनुभव सांगितले. यावेळी विद्यार्थी मनोगतामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती ऋण व्यक्त केले.

कार्यक्रमादरम्यान सोनेरी क्षण या माजी विद्यार्थ्यांच्या ग्रुपतर्फे शाळेला ‘संत मुक्ताबाई’ची प्रतिमा देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लीना चौधरी-नेमाडे यांनी केले तर सूत्रसंचालन मु.जे. महाविद्यालयाचे प्रा.जयंत इंगळे व साकरी जि.प. शाळेच्या प्राथमिक शिक्षिका दिपाली पाटील यांनी केले. आभार माजी विद्यार्थी व वोल्स्कवॅगन कंपनीचे मॅनेजर इंजि. विनायक श्रीखंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उमाकांत पाटील, प्रा.जयंत इंगळे, अतुल चौधरी, लीना नेमाडे, दिपाली चौधरी, निशिकांत पाटील, राहुल चौधरी, गणेश चौधरी, सुपडू बेलदार व विनायक श्रीखंडे आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज