‘या’ पालिका निवडणुकीसाठी होणार महाआघाडी, पत्रकार परिषदेत नेत्यांची माहिती

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२१। रावेर नगरपालिकेची निवडणूक राज्यातील महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार लढणार असून याबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमत झाल्याची माहिती आमदार शिरीष चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रावेर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची पहिली बैठक नुकतीच आमदार शिरीष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यांनतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आघाडीचे नेतृत्व व निर्णयाच्या अधिकाराची सर्व सूत्रे आमदार चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे शिवसेनेचे संघटक रवींद्र पवार यांनी यावेळी सांगितले. बैठकीला नगराध्यक्ष दारा मोहम्मद जाफर मोहम्मद, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मेहमूद शेख, माजी नगराध्यक्ष हरीष गनवाणी, रमेश महाजन, जिल्हा संघटक रवींद्र पवार, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, अनिल अग्रवाल, प्रकाश मुजुमदार, सोपान पाटील, नगरसेवक आसिफ मोहम्मद, राजेंद्र चौधरी आदी उपस्थित होते.

विजयी होणाऱ्या उमेदवारांनाच संधी
निवडणुकीसंदर्भात वेळोवेळी बैठका घेतल्या जाणार आहेत. प्रभाग व आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छूक उमेदवारांची चाचपणी करण्यात येणार असून तिन्ही पक्षाच्या तालुक्यातील प्रमुखांना विश्वासात घेऊन व आरक्षणानुसार निवडणुकीत विजयी होणाऱ्या उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. जातीपातीचे राजकारण बदलण्यासाठी सर्व समाजघटकांना सोबत घेण्याचा महाविकास आघाडीचा हा प्रयत्न आहे, असे आमदार चौधरी यांनी यावेळी सांगितले. आघाडीसोबत संघटना किंवा इतर आघाड्या येत असतील तर त्यांना सोबत घेऊन निवडणूक लढवण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज