fbpx

फक्त १०० रुपये मजुरी मिळत असल्याने अकुलखेड्याच्या शेतमजुरांनी घेतला ‘हा’ निर्णय

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२१ । चोपडा तालुक्यातील अकुलखेडा येथील शेतमजुरांना कामाच्या मोबदल्यात फक्त १०० रुपये मजुरी मिळत असल्याने २ हजार मजुरांनी बेमुदत संप पुकारला आहे. यापूर्वीही दोन वेळा आंदोलन करण्यात आले आहे. त्याची दखल न घेतल्याने शेतमजुरांनी हा निर्णय घेतला आहे. शेतमजुरांची पिळवणूक थांबवावी व तत्काळ मागणी पूर्ण करण्याची मागणी लाल बावटा शेतमजूर युनियनने केली आहे.

स्त्री मजुरांना किमान २०० रुपये व पुरुष मजुरांना ३०० रुपये मजुरी द्यावी, पी. एम. किसान सन्मानधन धरतीवर शेतमजूर सन्मान मानधन द्यावे, अकुलखेडा गाव परिसरात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू करावी व शेतमजुरांना उज्वल गॅस लाभ, कोविड काळ संपत नाही तोपर्यंत किमान १ हजार रुपये रोख रक्कम आदी मागण्यांसाठी शेतमजुरांनी अकुलखेडा ग्रामपंचायतीवर सोमवारी मोर्चा काढला.
नेतृत्त्व लाल बावटा शेतमजूर युनियन राष्ट्रीय कमिटी मेंबर कॉ.अमृत महाजन, युनियनचे तालुका सचिव कॉ. गोरख वानखेडे, संघटिका हिराबाई सोनवणे, रमेश महाजन यांच्या मार्गदर्शनात अकूलखेडा ग्रामपंचायत वर मोर्चा काढण्यात आला.

mi advt

संपाचे निवेदन ग्रामपंचायतचे सरपंच लक्ष्मण बाविस्कर, ग्राम विकास अधिकारी विसावले, उपसरपंच योगेश पाटील, विकास पाटील, श्याम पाटील, ज्येष्ठ सदस्य अनंत महाजन यांनी स्वीकारले. निवेदन देतेवेळी कॉम्रेड महाजन, गोरख वानखेडे ,रमेश महाजन, हिराबाई सोनवणे, शाखाध्यक्ष गुरुदास मोरे, उपाध्यक्ष किशोर पाटील, सचिव संगीता धनगर, सदस्य अलका पाटील, कमलबाई भील, रजुबाई कोळी ,गोपाळ माळी, अनिता पाटील, वैशाली जगताप सुरेखा अहिरे, उशाबाई पाटील आदी उपस्थित होते.

यापूर्वी दोनवेळा संप
मजुरीत वाढ करावी या मागणीसाठी यापूर्वी दोन मोठे संप झाले. त्यानंतरही दखल न घेतल्याने नाईलाजास्तव सोमवारपासून शेतमजुरांनी बेमुदत संपाचा निर्णय घेतला आहे, असे शेतमजूर युनियनतर्फे जाहीर करण्यात आले. “शेतकऱ्यांवर अस्मानी व सुलतानी संकट जरी आले असले तरी त्याचे उट्टे शेतमजुरांवर काढणे योग्य नाही, असे पत्रकात नमूद केले.
मोर्चात एकत्र आलेले अकुलखेड्यातील शेतमजूर.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज