जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृषि विभागाचा सल्ला

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ ऑगस्ट २०२१ । जळगाव जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी समाधानकारक पाऊस नसल्याने पिकाला पाण्याचा ताण पडायला सुरुवात झाली आहे. ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे तेथे पिकाला संरक्षित पाणी द्यावे, पाण्याची कमी उपलब्धता असेल तर सरी आड सरी पाणी द्यावे. ठिबक सिंचनाची व्यवस्था असेल तर जमिनीच्या मगदुरानुसार दीड ते दोन तास ठिबक सिंचन संच चालवून पाणी द्यावे. असा सल्ला जळगाव तेलबिया संशोधन केंद्राचे कापूस पैदासकार डॉ. संजीव पाटील यांनी दिला आहे.

पिकाला पाण्याचा मोठा ताण पडू देऊ नये, कायम वाफसा परिस्थीतीत ठेवावी. मोठा ताण पडल्यानंतर पाऊस आल्यास किंवा पाणी दिल्यास झाडे उभळन्याची (आकस्मिक मर रोग) शक्यता असते. ज्याठिकाणी कोणतीही पाणी देण्याची व्यवस्था नाही अशाठिकाणी पिकाला हलक्या कोळपन्या करणे सुरु ठेवावे. तसेच 13:00:45 या विद्राव्य खतांची (1टक्के) 100 लिटर पाण्यात 1 किलो याप्रमाणात फवारणी करावी, 15 दिवसांनी परत दुसरी फवारणी करावी.

रस शोषणाऱ्या किडींचे सर्वेक्षण करुन कीड आर्थिक नुकसान पातळीच्या वर असल्यास आंतरप्रवाही कीटकनाशकांची फवारणी करावी. एका वेळेस एकच किटकनाशक वापरावे, 5 टक्के निंबोळी अर्क/ quinolphos 20%, गुलाबी बोंडअळी साठी फेरोमन trap लावून घ्यावेत व नियमित सर्वेक्षण करावे. डोमकळया दिसल्यास तोडून नष्ट कराव्यात. कीड आर्थिक नुकसान पातळीपेक्षा जास्त असल्यास कीड संरक्षणात्मक उपाय योजना करावी. पुरेसा पाऊस झाल्यानंतर जमिनीत ओल असल्यास नत्रयुक्त खतांचा दुसरा हप्ता दिला गेला नसेल तर एकरी एक गोणी युरिया खताची मात्रा द्यावी, कपाशीच्या दोन सरीनंतर 1 मृत सरी काढावी. पाऊस लांबल्यावर मृत सरीत साठलेल्या पाण्याचा पिकांसाठी उपयोग होतो. असेही डॉ. संजीव पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -