अवैध वाळू, गौण खनिज वाहतुकीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

यावल तालुक्यातून चौकशीची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । सुरेश पाटील । यावल शहरात व तालुक्यात अवैध गौण खनिज चोरट्या वाहतूकीकडे जिल्हाधिकारी जळगाव आणि जिल्हा गौण खनिज प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने यावल तालुक्यातील अवैध गौण खनिज अनेक प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी यावल तालुक्यातून करण्यात आली आहे.

यावल तालुक्यात संपूर्ण मंडळांमध्ये अवैध गौण खनिज वाहतूक सर्रासपणे खुलेआम सुरू आहे. अवैध गौण खनिज वाहतुकीत महसूल विभागातील एक जबाबदार अधिकारी आपल्या पदाचा आणि अधिकाराचा वैयक्तिक स्वार्थापोटी सोयीनुसार वापर करून लाखो रुपयाची कमाई करून घेत आहे.

अवैध गौण खनिज चोरटी
वाहतूक करणारे राजकीय आणि सामाजिक प्रभावामुळे रोज नवीन नवीन शक्कल लढवून अवैध वाळू वाहतूक करीत आहेत. अवैध गौण खनिज वाहतूक करणारी डंपर, ट्रॅक्टर वाहने संबंधित सर्कल तलाठी यांनी पकडल्यानंतर रीतसर पंचनामा करून यावल किंवा फैजपुर पोलीस स्टेशनला जमा केलेले असतात नंतर या जमा केलेल्या अवैध वाळू वाहतुक वाहन चालक-मालकावर महसूल विभागातील तहसीलदार किंवा प्रांताधिकारी यांच्यामार्फत दंडात्मक व इतर कार्यवाही करण्यात आली आहे असे लेखी आदेश वजा पत्र पोलिसांना देण्यात येत असल्याने अवैध वाळू वाहतुकीची वाहने पोलीस सोडून देत असतात.यातील काही अवैध वाळू वाहनधारकांना महसूल तर्फे रितसर नोटीस देऊन त्यांचे म्हणणे मागविण्यात येते त्यात अवैध वाळू वाहतूकदार संबंधित जबाबदार अधिकाऱ्याशी आर्थिक संगणमत करून लेखी जबाबात कायदेशीर पळवाट काढून जमा केलेल्या ट्रॅक्टर मध्ये अवैध वाळू वाहतूक नव्हती शिवाय इतर साहित्य ट्रॅक्टर मध्ये होते किंवा अवैध वाळू वाहतूक कमी ब्रास होती इत्यादी अनेक कारणे दाखवून नाम मात्र रॉयल्टी वसूल करून तसेच काही वाहनधारकांकडून रितसर चलन न भरता रॉयल्टी वसूल न करता वाहने सोडून देण्यात आलेली आहेत.

या प्रकरणांमध्ये तलाठी सर्कल यांनी केलेला पंचनामा हा संशयास्पद असतो का?असा प्रश्न उपस्थित होत असून नंतर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांची कडे लेखी खुलासा का व कशासाठी मागविला जातो यातच मोठे गूढ रहस्य दडपून आहे.या सर्व प्रकरणाची जिल्हाधिकारी जळगाव आणि जिल्हा गौण खनिज प्रशासन यांनी चौकशी करावी अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास जळगाव जिल्हा संघटक सुरेश पाटील यांनी केली आहे.

यात प्रामुख्याने वाळूने भरलेल्या डंपर व ट्रॅक्टर मध्ये वाळूच्यावर माती किंवा स्टोनक्रशर कच टाकून पोलीस व महसूल प्रशासनाची दिशाभूल करून अवैध वाळू वाहतूक सर्रासपणे सुरू आहे पोलिसांनी डंपर,ट्रॅक्टर पकडले असता काही राजकीय पदाधिकारी आणि यावल तालुकास्तरीय एक शासकीय अधिकारी मोठा आर्थिक व्यवहार करून कागदोपत्री पळवाटा शोधून अवैध वाळू वाहतूकदारांकडून मोठी रक्कम घेऊन नाम मात्र कारवाई करीत आहेत याकडे जळगाव जिल्हाधिकारी यांनी लक्ष केंद्रित करावे अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.गेल्या वर्षभरात सर्कल तलाठी यांनी अवैध गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर,डंपर पकडून पंचनामा करून यावल किंवा फैजपुर पोलीस स्टेशनला जमा केल्यानंतर मात्र अनेक ट्रॅक्टर डंपर सोडतांना महसूल विभागाकडून काही प्रकरणात मोठ मोठे आर्थिक व्यवहार करण्यात आले असून ते ट्रॅक्टर आणि डंपर नाम मात्र कारवाई करून सोडून देण्यात आली आहेत. या सर्व प्रकरणाची जिल्हाधिकारी जळगाव यांनी चौकशी केल्यास महसूल विभागाचे फार मोठे रॅकेट उघडकीस येईल असे तालुक्यात बोलले जात आहे.

यावल परिसरात यावल, बोरावल,भालशिव,पिप्रि या रस्त्याचे रुंदीकरण झाल्यापासून अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने रात्रंदिवस सुसाट वेगाने धावत असतात याकडे यावल मंडळ अधिकारी आणि गौण खनिज पथकाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे यावल शहरात विकसित भागात सकाळी तीन वाजेपासून अवैध वाळू वाहतूकदारांची मोठी वर्दळ गोंधळ सुरू असतो हे महसूल विभागाला दिसत नाही का? तहसीलदार कार्यवाही का करीत नाहीत दंडात्मक कारवाई नाममात्र असते का इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत याचप्रमाणे विदगाव,कोळन्हावी जवळील तापी नदी पुलावरून डांभुर्णी किनगाव परिसर शिरसाड,साकळी,मनवेल, थोरगव्हाण, दहीगाव, सावखेडा कोरपावली, सातोद, कोळवद, डोंगर कठोरा,फैजपूर,न्हावी. हिंगोणा,हंबर्डी परिसरातील मंडळात सुद्धा अवैध गौण खनिज वाहतूक सर्रासपणे सुरू आहे.

तसेच यावल तहसील कार्यक्षेत्रात असलेले स्टोन क्रशर चालक-मालक सुद्धा सोयीनुसार गौण खनिजाचे वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात उत्खनन करून महसूल विभागात नाम मात्र रॉयल्टी भरून आपला आर्थिक लाभ करून घेत आहे.वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध होता बरोबर एक अधिकारी कायदेशीर कारवाई न करता स्टोन क्रशर चालक-मालक यांच्याकडून तसेच अवैध वाळू वाहतूक दाराकडून लाखो रुपयांची कमाई करून घेत असल्याची काही प्रकरणे सुद्धा अवैध वाळू वाहतुकीत झालेली आहे या सर्व प्रकरणांची जिल्हाधिकारी जळगाव जिल्हा गौण खनिज प्रशासन यांनी चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी यावल तालुक्यातून होत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज