चिंचगव्हाणच्या अनुसयाला शिक्षणासाठी मिळाले आर्थिक पाठबळ

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२१ । दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के मार्क मिळवले, पुढे शिक्षण करण्याची प्रचंड इच्छा परंतु घरची परिस्थिती गरिबीची असल्याने पुढील शिक्षण होईल की नाही, या विवंचनेत असताना आरंभ या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य अनुसयाच्या मदतीला देवासारखे धावून आले आणि तिला तब्बल ३९ हजार रुपयांची मदत केली. अनुसयाला मिळालेल्या या मदतीमुळे तिला पुढील शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ मिळाले आहे.

चाळीसगाव तालुक्यातील चिंचगव्हाण येथील अनुसया आत्माराम पवार या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के मार्क मिळवले. पुढे शिक्षणाची प्रचंड जिद्द पण घरची परिस्थिती गरिबीची. आई मंगलाबाई या शेती काम करून कुटुंबाचा गाडा हाकतात. अनुसया ही घरातील सर्वात लहान मुलगी, जन्मता हुशार, चिंचगव्हाण माध्यमिक विद्यालयात दहावीत शिकत असताना दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के मार्क तिने मिळवले. तिला शिक्षणाची आवड परंतु गरिबीची परिस्थिती आडवी आलेली असताना आरंभ व्हाट्सअप ग्रुप अनुसयाच्या मदतीला धावून आला. गुणवंत विद्यार्थी गौरव, पालक प्रेरणा सोहळा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन असे अनेक उपक्रम राबवून आरंभ ग्रुपने सामाजिक कार्यात आपली चुणूक दाखवली आहे. समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो ही भावना मनाशी बाळगून हा ग्रुप कार्य करत आहे.

अनुसुया पवारच्या पुढील शिक्षणासाठी जळगाव महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी कपिल पवार, चाळीसगाव भूषण आयएएसचे समन्वयक प्रवीण पवार यांनी खान्देशी अधिकारी ग्रुपवर मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत तहसीलदार दीपक पाटील, शिवाजी ढोले मित्र मंडळ यांच्या वतीने ११ हजार रुपये, गोरख पवार दहिवद यांच्यातर्फे १ हजार १०० रुपये व अन्य ठिकाणाहून असे एकूण ३९ हजार १०० रुपयाची आर्थिक मदत जमा झाली. जमा झालेली मदत अनुसया व तिच्या वडिलांना सुपूर्द करण्यात आली. मदतीने का होईना अनुसयाला उच्च शिक्षण घेता येणार आहे. या कामाबद्दल ग्रुपचे सगळीकडे कौतुक होत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज