fbpx

बहिणीला भेटण्यासाठी गेलेल्या भावाचा अपघाती मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२१ । चोपडा तालुक्यातील वेले फाट्याजवळ भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना शनिवारी घडलीय. हर्षल भिका पाटील (वय २०), नितीन निंबा भील (वय २३) अशी मृतांची नावे आहेत. तर ऋषीकेश छोटू पाटील (वय २२, तिघेही रा. वाघळुद, ता. धरणगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे.  या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, ऋषीकेश याच्या मोठ्या बहिणीचे सासर चोपड्यात आहे. तिला भेटण्यासाठी तिघेजण शनिवारी सकाळी दुचाकीने (एमएच १९ बीसी ७८०४) गेले होते. यानंतर दुपारी ते परतीच्या प्रवासाला निघाले होते. यावेळी वेले फाट्याजवळ पोहचल्यावर त्यांच्या दुचाकीला समोरून भरधाव वेगाने आलेल्या मालवाहू वाहनाने (एमएच १८ एए २३०३) जोरदार धडक दिली. या अपघातात नितीनचा जागीच मृत्यू झाला तर हर्षल याला जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. ऋषीकेश याच्यावर चोपडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 त्याचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच वाघळुद येथील नागरीकांनी थेट चोपडा रुग्णालय व नंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोन्ही जखमींना मृत घोषित केले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या अपघातात मृत झालेला नितीन भील हा एकुलता एक मुलगा होता. वडील निंबा भील हे सेन्ट्रींग काम करून उदरविर्वाह करतात तर नितीन देखील शेतमजुरी करून कुटुंबास हातभार लावत होता. दीड महिन्यांपूर्वीच नितीनचे लग्न झाले आहे तसेच हर्षल हा देखील कुटुंबात एकुलता होता. त्याला एक विवाहित बहीण आहे. हर्षलचे वडीलही सेन्ट्रींग काम करतात. हर्षल वायरमन होता. 

खासगी कामे करून तो कुटुंबास हातभार लावत होता. वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबतही तो नियमित काम करीत असे. शनिवारी चोपड्याला जायचे असल्यामुळे तो त्या कर्मचाऱ्यासोबत गेला नाही. दुर्देवाने त्याचे अपघातात निधन झाले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज