fbpx

महामार्गावर अपघातांचे सत्र कायम ; रस्ता सुरक्षेचा महामार्ग प्राधिकरणाला विसर

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२१ । भुसावळ शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. खडी, गिट्टी, मुरूम रस्त्यावरच असून काही ठिकाणी एकाच रस्त्यावर दुहेरी वाहतूक चालू असल्यामुळे नागरीकांचा अपघात होत आहे. काम सुरू असतांना वर्क इन प्रोग्रेस अश्या सूचना फलक लावणे गरजेचे असते, या नियमांचा विसर प्राधिकरणाला पडला आहे. राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागामार्फत या अपघातांची गांभिर्याने दखल घेण्यात आली नसून अद्याप अपघातांची मालिका कायम सुरू आहे. प्रत्यक्ष पाहणी नंतर महामार्ग प्राधिकरणाच्या वरीष्ठ अधिकार्‍यांना सूचना केल्यावर सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केल्याने शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी रस्ते व अवजड वाहतूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार ऑनलाईन दाखल केली आहे.

रस्ता सुरक्षेचा प्राधिकरणाला विसर

कमी पावसाने रस्त्यावर चिखल झाला तर अधिक पावसात काय परिस्थिती राहील? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. रस्त्यावर व कडेला कायम खडी, गिट्टी किंवा माती पडलेली असते त्यावरून अपघात होत आहेत. खड्डे केलेल्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था नाही, फलक सुद्धा नाहीत. महामार्गालगत असलेल्या संलग्न रस्त्यांची दुरावस्था झाली मात्र याकडे संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष केले जाते, असे तक्रारीत नमूद केलेले आहे.

तर सेना स्टाईल आंदोलन

चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यापासून बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये अनेक अपघातांची नोंद झाली असून नागरीकांचा जीव गेला आहे. वेळोवेळी सूचना दिल्यावरसुद्धा प्राधिकरण झोपेचे सोंग घेत आहे.  त्यांना नागरिकांच्या जीवाशी काहीही देणेघेणे नाही. वेळीच उपाययोजना न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असे शिवसेना तालुका संघटक प्रा.धीरज पाटील म्हणाले.

रस्ता खोदल्यानंतर अंधारात पडलो: सोपान वराडे

दुतर्फा खोदलेल्या रस्त्यामुळे अंधारात खड्डयात पडलो, नाकातून रक्त वाहत होते. प्रवाश्यांनी डॉक्टरांकडे दाखल केल्यावर नाकाचे हाड तुटल्याचे समजले. संचारबंदी असल्याने काम नाही, त्यात आता उपचारासाठी मोठी रक्कम खर्च होईल. महामार्ग प्राधिकरणाने उपचारासाठी भरपाई द्यावी, असे अपघातग्रस्त प्रवासी सोपान वराडे म्हणाले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज