fbpx

मुक्ताईनगर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना शिक्षकांच्या रिक्त पदांचे ग्रहण

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । ग्रामिण भागात शिक्षणाचा कणा असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा दि.४ ऑक्टोबरपासुन सुरु होणार आहे. दोन वर्षाच्या कालखंडानंतर शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तालुक्यात १०८ शाळा असुन ९७ शाळा मराठी माध्यमाच्या तर ११ शाळा उर्दु माध्यमाच्या आहेत. मात्र पुरेशा प्रमाणात शिक्षक उपलब्ध नसल्याने अपुऱ्या शिक्षकांकडून विद्यार्जनाचे काम करण्यास अडचणी निर्माण होणार आहे.

एकंदरीत वस्तुस्थिती पाहता मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये ३७६ पैकी ८५ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत तर उर्दु विभागात ७६ पैकी २४ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. याशिवाय शालेय पोषण आहार अधिक्षक पद रिक्त असुन शिक्षणाधिकारी पद प्रभारी आहे. शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची तिनही पदे रिक्त आहेत. तसेच नऊ पैकी सहा केंद्रप्रमुख पदे रिक्त आहे. पर्यवेक्षक यंत्रणेतील जवळपास ८५% पदे रिक्त आहे. परिणामी तालुक्यातील शिक्षण विभागाला रीक्तपदांचे ग्रहण लागले की काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

मराठी माध्यमांच्या एकुण ९८ शाळांना ३७६ पदे शिक्षणाचा अधिकार अंतर्गत मंजूर असतांना तब्बल ८१ पदे आज रोजी रिक्त आहेत. यात ग्रेडेड मुख्याध्यापक पदे १९ आहेत मात्र दोनच ग्रेडेड मुख्याध्यापक कार्यरत आहे. पदवीधर शिक्षकांच्या ३९ पैकी ९ पदे रिक्त तर उपधिक्षकांची ३१८ पैकी ५९ पदे रिक्त अवस्थेत आहे. उर्दु माध्यमांच्या एकुण ११ शाळेत असलेल्या सातपैकी पाच ग्रेडेड मुख्याध्यापक पदे रिक्त असुन केवळ दोनच पदांवर कारभार आहे. पदवीधर शिक्षकांची २० पैकी ७ पदे रिक्त तर उपशिक्षकांची ४९ पैकी १२ पदे रिक्त आहेत.

सोळा शाळेचा भार एका शिक्षकावर
शिक्षण विभागाच्या अनास्थामुळे तालुक्यातील सोळा शाळा ह्या प्रत्येकी एकच शिक्षक सांभाळणार असल्याचे चित्र आहे. मधापुरी, नरवेल, धामणदे, वडोदा वस्ती,मन्यारखेडा, कुऱ्हा बाॅईज, कुऱ्हा कन्या, थेरोळा, काकोडा, धुळे, राजुरा पाडा, ढोरमाळ, मुंढोंळदे, महालखेडा, चिंचखेडा खुर्द व मुक्ताईनगर शाळा क्र.२ या सोळा गावातील शाळा प्रत्येकी एका शिक्षकावरच अवलंबुन आहे. राजोरा येथे असलेली एकशिक्षकी शाळेचे शिक्षक यांचा कोरोनामुळे मृत्यु झाल्याने या शाळेला आजरोजी शिक्षकच नसल्याची शोकांतिका आहे.

वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा
“सध्या पाचवीपासून शाळा सुरू होत आहे.तालुक्यात शिक्षक संख्या कमीच आहे. शिवाय त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी पर्यवेक्षक यंत्रातील अधिकारी पदे रिक्त असल्याने अडचणी आहे. शिक्षकांपाठोपाठ किमान पर्यवेक्षक पदेही भरावेत यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करत आहोत.”
– विजय पवार, प्रभारी गटशिक्षणाधिकारी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज