fbpx

पोलीस भरतीसाठी १० हजारावर उमेदवार गैरहजर; एकाने केली डिजीटल कॉपी, गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२१ । जिल्हा पोलीस प्रशासनाकडून आज घेण्यात आलेल्या १२८ जागेंसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी २१ हजार ६९० पैकी तब्बल १० हजार १५४ विद्यार्थी गैरहजर होते.

जळगांव जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवर १२८ पोलीस शिपाई पदांच्या रिक्त पदांसाठी सुरु करण्यात आलेली आहे. पोलीस शिपाई भरती २०१९ मधील आवेदन अर्ज सादर केलेल्या एकूण २१ हजार ६९० उमेदवारांसाठी जळगांव शहर व भुसावळ शहर या ठिकाणच्या परीक्षा केंद्रावर पोलीस शिपाई भरती २०१९ साठी लेखी परीक्षा आयोजित करण्यात आलेली होती. परीक्षेचा पेपर सकाळी ११.०० वाजता सुरु करण्यात आला व दुपारी १२.३० वाजता संपविण्यात आला. लेखी परीक्षेकरिता बोलाविण्यात आलेल्या एकुण २१ हजार ६९० उमेदवारांपैकी ११ हजार ५३६ उमेदवार लेखी परिक्षेकरिता हजर होते व १० हजार १५४ उमेदवार लेखी परिक्षेकरिता गैरहजर होते. परीक्षेकरीता अंदाजे ५३.१८ टक्के उमेदवारांनी उपस्थित लावली.

mi advt

पेपर संपल्यानंतर २ तासांनतर परीक्षेची उत्तर तालिका जळगांव जिल्हा पोलीस दलाचे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. परीक्षेच्या उत्तरतालिकेबाबत काही हरकती आक्षेप असल्यास प्रभारी पोलीस उपअधीक्षक यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९५५२५९००६९ व पोलीस भरती मदत कक्षाचा हेल्पलाईन नं. ०२५७ २२३३५६९ वर हरकती/आक्षेप असल्यास पाठविता उद्या दि.१० रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत पाठविता येऊ शकतात. किंवा जळगांव पोलीस अधीक्षक कार्यालयाचे ईमेल आयडी [email protected] वर पाठविता येतील. सदर परिक्षेचा निकाल जळगांव पोलीस दलाचे वेबसाईटवर दि.१० रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

परीक्षेत कॉपी करण्याचा प्रयत्न
दोन घटनांचा अपवाद वगळता पोलीस शिपाई भरती परीक्षा अत्यंत सुरळीतपणे पार पडलेली आहे. मे. न्यासा कम्युनिकेशन कंपनीला सदरहू परीक्षेसाठी बॅडर म्हणून निवड करण्यात आलेली होती. परीक्षेकरीता परीक्षा केंद्र असलेल्या जळगांव शहरा लगतच्या नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी कॉलेज बांभोरी शिवार ता. धरणगांव येथील प्राध्यापक यांचे फिर्यादीवरून त्या अनुषंगाने न्यासा कंपनीमार्फत पर्यवेक्षक म्हणून रुम नं.५ मध्ये डयूटी दिलेली होती. या परीक्षा केंद्रावरील रुम नं. ५ मधील परीक्षार्थी उमेदवार योगेश रामदास आव्हाड वय २७ धंदा शिक्षण रा. पांझणदेव पोस्ट, नागापुर ता. नांदगाव जि.नाशिक याने मोबाईल बाळगून मोबाईलमधून व्हॉटसअँपद्वारे प्रश्न पाठवून उत्तरे मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. यासंदर्भात परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक प्राध्यापक यांनी पाळधी दूरक्षेत्र येथे दिलेल्या फिर्यादीवरून धरणगांव पो.स्टे. येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. तसेच जळगांव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कुल, जळगांव येथील परीक्षा केंद्रावरील परीक्षार्थी उमेदवार प्रतापसिंग गुलचंद बालोद बैठक क्रमांक ७२१७०५९ हा परीक्षेत गैरप्रकार करत असतांना निदर्शनास आला आहे. परीक्षार्थीवर देखील गुन्हा दाखल करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही सुरु आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज