fbpx

अहो आश्चर्यकारक….चिनावल येथे एटीएममधून निघाली चक्क पाच पट रक्कम

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२१ । रावेर तालुक्यातील चिनावल येथील टाटा इंडिकॅशच्या एटीएममध्ये एक आश्चर्यकारक प्रकार घडला आहे. एटीएममधून चक्क टाकलेल्या रकमेच्या पाच पट पैसे निघत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे बसस्थानक परिसरातील टाटा इंडीकॅश एटीएमबाहेर रात्री ७ ते ९ वाजेपर्यंत मोठी गर्दी उसळली. दोन तासांतच ६ लाखांची रक्कम काढली गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली. हा प्रकार कळताच पोलिसांनी एटीएम बंद करून गर्दी पांगवली.

मंगळवारी सायंकाळी चिनावल येथील टाटा इंडिकॅशच्या एटीएममधून टाकलेल्या रकमेच्या पाच पट पैसे निघत असल्याची बातमी गावात पसरली. यानंतर अनेकांनी एटीएम गाठून अवघ्या दोन तासात सुमारे ६ लाख रुपये काढले. रात्री ९ वाजेच्या सुमारास इंडीकॅश कंपनीच्या ठेकेदारी तत्त्वावरील कॅश लोडिंग कर्मचाऱ्याला ही माहिती मिळताच तो गावात दाखल झाला. त्याने सावदा पोलिस ठाण्यात संपर्क साधला. यानंतर पोलिसांनी चिनावल गाठून एटीएमवरील गर्दी पांगवली. एटीएम लाॅक केले.

mi advt

मात्र, तोपर्यंत बरीच रक्कम काढली गेली होती. याबाबत अद्याप सावदा पोलिस ठाण्यात नोंद झालेली नसली तरी सुरक्षेसाठी हवालदार विनोद पाटील,पिंजारी, ईशान तडवी, सुरेश अढाएगे, होमगार्ड प्रकाश भालेराव येथे गावात तळ ठोकून होते. या प्रकाराबाबत एटीएमच्या लोडिंग कर्मचाऱ्याला विचारणा केली असता, पैसे भरताना नोटांची ब्लाॅक सेटींग चुकीची झाली असावी. किंवा मशीन सेटींगमध्ये बिघाड झाल्याचा अंदाज वर्तवला. तसेच मंगळवारी चिनावलचा आठवडे बाजार असल्याने सकाळी एटीएममध्ये ७ लाख रूपये भरले होते, असे समोर आले.

आज विड्रॉल तपासणार

याबाबत इंडिकॅश कंपनीची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया उशिरापर्यंत मिळाली नाही. मात्र, बुधवारी ज्या लोकांनी एटीएम कॅश विड्रॉल केली, त्यांची माहिती काढली जाणार आहे. त्यानंतर संबंधितांकडून अतिरिक्त वसूल होण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज