राज्यातील विजेची तूट दिपनगर केंद्र कमी करणार, ‘इतके’ मेट्रिक टन कोळसा उपलब्ध

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२१ । मुसळधार पावसामुळे राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात कोळसाटंचाई निर्माण झाली आहे. दिवाळीचा सण पुढील महिन्याच्या सुरुवातीला येत आहे. अशा स्थितीत यावर्षी दिवाळी अंधारात जाणार नाही ना? याची चिंता नागरिकांना आहे.  दरम्यान, पाऊस थांबल्याने वेस्टर्न कोलमील लिमिटेडकडून मिळणाऱ्या कोळशाचे प्रमाण वाढले असून भुसावळ (दीपनगर) औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात सोमवारी २९ हजार मेट्रिक टन कोळसा साठा झाला. त्यामुळे आज मंगळवारी दीपनगर केंद्रातून राज्याला सुमारे १ हजार मेगावॅट विजेचा पुरवठा होईल. परिणामी राज्यातील ३३०० पैकी किमान ४५० मेगावॅट विजेची तूट भरून निघेल.

राज्यातील महानिर्मितीच्या संचांना सध्या कोळशाचा तुटवडा सहन करावा लागत आहे. वीजनिर्मितीसाठी पुरेसा कोळसा नसल्याने दीपनगर केंद्रातील ५०० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक ५ दोन दिवसांपूर्वी बंद केला होता. यानंतर केंद्रात गेल्या दोन दिवसांत २९ हजार टन कोळसा साठा करण्यात आला. ५०० मेगावॅट क्षमतेचे दोन्ही संच सुरू ठेवण्यासाठी २४ तासांत १७ हजार टन कोळसा जाळला जातो. तसेच २१० मेगावॅटचा संच कार्यान्वित झाल्यास २० हजार टन कोळसा लागतो. परंतु दीपनगर केंद्रात २९ हजार टन कोळसा साठा उपलब्ध असून तो अवघ्या दीड दिवस पुरेल इतकाच आहे.

दीपनगरातील २१० मेगावॅटचा संच क्रमांक ३ कोळशाअभावी बंद आहे. तरी दुसरीकडे दररोज वीजनिर्मितीसाठी लागणारा कोळसा देखील उपलब्ध होत आहे. त्यामुळे महानिर्मितीने दीपनगरातील बंद असलेला ५०० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक ५ सोमवारी मध्यरात्री कार्यान्वित केला. तर आज मंगळवारी सकाळी या संचांतून ८० टक्के पीएलएफ गाठून वीजनिर्मिती होईल. यामुळे राज्यात सध्या निर्माण झालेली ३३०० मेगावॅटची तूट किमान ४५० मेगावॅटने कमी होईल. आगामी सण उत्सवात राज्यातील वीज मागणी पुन्हा वाढणार आहे. त्यामुळे कोळसा साठा वाढवण्याचे महानिर्मितीचे प्रयत्न आहेत. कोळसा मिळाल्यास बंद असलेला २१० मेगावॅटचा संच क्रमांक ३ सुरु होईल, असे संकेत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज