जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यासह जळगाव जिल्ह्यात महिलांसह मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या कमी होण्याऐवजी वाढताना दिसत असून अशातच चोपडा येथून एक खळबळजनक घटना समोर आलीय. शेतामध्ये एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून नंतर तिच्या डोक्यात दगड घालून निर्घुण हत्या करण्यात आली आहे. तिच्या लहान बहिणीने हा प्रकार गावकऱ्यांना सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याबाबत एका संशयित नराधमाला अटक करण्यात आलीय.
घटना काय?
चोपडा शहरापासून १५ ते २० किलोमीटर असलेल्या गावात एक मोलमजुरी करणारा परिवार शेत शिवारामध्ये राहतो. शेतातील निंदणीचे काम आटोपून मालापूर विरवाडे रस्त्याने घरी दोन्ही बहिणी निघाल्या होत्या. याच दरम्यान मोठ्या बारावर्षीय बहिणीला आरोपीने एका शेतामध्ये ओढत नेऊन तिच्यावर बळजबरी अत्याचार केला.
त्यानंतर घटना उघडकीस येऊ नये म्हणून त्याने तिला दगडाने ठेचून मारून टाकले. मात्र, ही घटना तिच्यासोबतच्या लहान बहिणींने पाहिल्यानंतर सर्व हकीकत तिने विरवाडे गावकऱ्यांना सांगितली. त्यानंतर गावकरी तिचा शोध घेऊ लागले. याच रस्त्यावर गूळ मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्याजवळील पाटचारीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पीडिता विवस्त्र सापडली. तिला लगेच ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेनंतर मारेकऱ्याने पळ काढला. पोलिस पाटील आणि सरपंच यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी मारेकऱ्याचा तपास सुरू केला. चोपडा-आडगाव रस्त्यावर तो पळून जात असताना पोलिसांच्या हाती लागला. जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधिकारी कविता नेरकर हे घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान एकीकडे संपूर्ण जिल्ह्यात गणेशोत्सव स्थापनेचे चैतन्यदायी वातावरण असताना दुसरीकडे मात्र चोपडा तालुक्यातील या घटनेने खळबळ उडाली आहे.