भरधाव वाहनाच्या धडकेत ७ वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२१ । आजीचा हात पकडून जात असलेल्या ७ वर्षीय बालकास भरधाव बोलेरोने दिलेल्या धडकेत बालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना एरंडोल शहरापासून तीन किमी अंतरावर म्हसावद रस्त्यावर घडली. अपघातानंतर पळून जाणाऱ्या बोलेरो चालकाला नागरिकांनी तब्बल आठ कि.मी. पाठलाग करून व रस्त्यावर ट्रॅक्टर, ट्रॉली आडवे लावून खडके फाट्याजवळ पकडले. त्याला एरंडोल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

उमरदे (ता. एरंडोल) येथील गंगुबाई पवार ह्या नातू पवन रावसाहेब सोनवणे (वय-७)याला घेऊन, धार्मिक कार्यक्रमासाठी एरंडोलला आल्या होत्या. दुपारी २ वाजता जेवण करून त्या एरंडोल-म्हसावद मार्गाने उमरदे येथे घरी जाण्यासाठी पायी जात होत्या. रस्त्याचे डाव्या बाजूने नातूचा हात धरून त्या पायी चालत असतांना त्याचवेळी म्हसावद रोडवरील सनी कंपनीसमोर म्हसावदकडे भरधाव जाणाऱ्या बोलेरो (क्र. एम.एच.१९, बी.यु.६९०३)ने पवनला जोरदार धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर बोलेरो चालक मनोज मोहन राठोड (वय-२२, रा.ढेकू तांडा, ता.अमळनेर) हा म्हसावदच्या दिशेने निघून गेला.

आठ कि.मी. केला पाठलाग
अपघातानंतर बोरेलो चालक म्हसावदच्या दिशेने निघून गेला. यावेळी गंगुबाई पवार यांच्यासोबत असलेल्या महिलांनी आरडाओरड केली. उमरदे येथील संदीप पाटील, योगेश पाटील व एरंडोल येथील माजी नगरसेवक संजय महाजन यांनी धाव घेत बोलेरोचा आठ कि.मी. पर्यंत पाठलाग केला. बोलेरो चालक थांबत नसल्याने पाठलाग करणाऱ्यांनी खडके येथील देवराम पाटील यांना फोन करून माहिती कळवली. त्यांनी आपले ट्रॅक्टर व ट्रॉली रस्त्यावर आडवी उभी करून बोरेलो चालकाला थांबविले. ग्रामस्थांनी संशयित चालकाला पकडून एरंडोल पोलिसांच्या ताब्यात दिले.

एकुलता एक मुलगा होता पवन
अपघातात पवनच्या डोक्याला मार लागला होता. त्याला एरंडोल ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याची तपासणी करून त्याला मृत घोषीत केले. मृत पवनचे वडील रावसाहेब सोनवणे हे मूळ रत्नपिंप्री (ता. पारोळा) येथील रहिवासी आहेत. ते कामनिमित्त उमरदे येथे वास्तव्यास होते. मृत पवनच्या पश्चात आई, वडील, लहान बहीण असा परिवार आहे. एकुलता एक मुलगा गमावल्याने पवनच्या आई-वडीलांनी आक्रोश केला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज