प्रवाशांसाठी महत्वाची बातमी: दोन दिवस भुसावळवरून धावणाऱ्या ९ रेल्वे गाड्या रद्द, जाणून घ्या कारण?

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ नोव्हेंबर २०२२ । तुम्ही जर उद्या म्हणजेच ७ नोव्हेंबर रोजी रेल्वेने भुसावळ स्थानकावरून नागपूर, पुणे, मुंबईकडे जाणार असाल तर तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण उद्या भादली स्थानकावर उद्या सोमवारी चौथ्या लाइनचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतल्यामुळे सोमवारी रात्री १२ वाजेनंतर नागपूर, पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या ९ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर भुसावळहून मुंबईकडे जाणाऱ्या काही गाड्यांना विविध स्थानकात थांबवण्यात येणार आहे. याबाबतची माहिती भुसावळ विभागाचे वरिष्ठ डीसीएम डॉ. शिवराज मानसपुरे यांनी दिली.

या गाड्या रद्द
भादली रेल्वे स्थानकात चौथ्या लाइनचे काम सुरू करण्यात येणार आहे. या कामादरम्यान ७ व ८ नोव्हेंबरदरम्यान मुंबई, पुणे, नागपूरकडे जाणाऱ्या नऊ गाड्यांना रद्द करण्यात आले आहे. यात (गाडी क्र. ११११३-१४) देवळाली-भुसावळ पॅसेंजर, (गाडी क्र.११९२०-२१) इगतपुरी-भुसावळ मेमू एक्स्प्रेस, (गाडी क्र. १९००५-६) भुसावळ-सुरत पॅसेंजर ७ व ८ नोव्हेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे.

(गाडी क्र. १९००७-८) भुसावळ-सुरत पॅसेंजर, (गाडी क्र. ०९०७७-७८) भुसावळ-नंदुरबार एक्स्प्रेस, (गाडी क्र. १११२७-८) भुसावळ-कटनी पॅसेंजर, (गाडी क्र. १२११२-११) अमरावती-मुंबई एक्स्प्रेस ही गाडी ७ व ८ नोव्हेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. (गाडी क्र. ११०२६-२५) पुणे-भुसावळ एक्स्प्रेस व (गाडी क्र. १२११४-१३) नागपूर-पुणे एक्स्प्रेस ही गाडी ८ व ९ नोव्हेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे.

या गाड्यांचा खोळंबा
पुण्याकडे जाणाऱ्या हटिया एक्सप्रेसला भुसावळला थांबवण्यात येणार आहे. तर, मुंबईकडे जाणाऱ्या अमृतसर एक्स्प्रेस व गोरखपूर एक्सप्रेसला भुसावळला थांबण्यात येणार आहे. तर निझामुद्दीन एक्सप्रेसला जळगावी, गोरखपूर एक्सप्रेसला शिरसोनी तर नांदेड निझामुद्दीन एक्सप्रेसला म्हसावद स्थानकात थांबवण्यात येणार आहे.