दुचाकीच्या धडकेत ८ महिन्याच्या गर्भवती महिलेचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२१ । वावडदा-म्हसावद रस्त्यावर आपल्या दोन नणदांसह शतपावली करीत असलेल्या ८ महिन्याच्या गर्भवती महिलेस दारूच्या नशेत असलेल्या दुचाकी चालकाने जोरदार धडक दिल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मृत महिलेच्या कुटुंबीयांनी घेतल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

ज्योती दीपक गोपाळ (वय-२१, रा. वावडदा) ही गर्भवती महिला तिच्या मीना आणि दीपाली या दोन्ही नणंदांसोबत वावडदा-म्हसावद रस्त्यावर शतपावली करण्यासाठी गेल्या होत्या. शतपावली करत असतांना समोरून येणाऱ्या सुपडू विक्रम जाधव (रा. वावडदा) या दुचाकीस्वाराने दारूच्या नशेत त्यांना जोरदार धडक दिली व २५ फुटांपर्यंत फरफटत नेले. यात ज्योती गोपाळ या गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, मृत ज्योती गोपाळ यांच्या कुटुंबीयांनी दोषीवर कठोर कारवाई होत नाही तोवर मृतदेह स्वीकारणार नसल्याचा पवित्रा घेत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.

महिलांना मारहाण?
घटनेनंतर सुपडू जाधव यांच्या कुटुंबीयांनी मयत महिलेच्या घरी जाऊन दोन्ही नणंदांसह सासूला शिवीगाळ व मारहाण करून धमकावले. तसेच ज्या दुचाकीने धडक दिली ती दुचाकी देखील लपवून दिली आहे. तसेच संशयिताने जाणीवपूर्वक धडक दिल्याचा आरोप मृत महिलेच्या नणंदांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित तरुणास ताब्यात घेण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज