७७ कोटींच्या अत्याधुनिक प्रकल्पाचे दूध संघातर्फे लवकरच होणार उदघाटन

जळगाव लाईव्ह न्यूज । २ नोव्हेंबर २०२१ । शहरातील जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादितने अत्याधुनिकतेची कास धरत ७७ कोटी रुपये खर्च करत आधुनिक दूध प्रक्रिया व दुग्धजन्य पदार्थ प्रकल्पाची निर्मिती केली असून, लवकरच या प्लॅन्टचे उद्‌घाटन करण्यात येणार असल्याची माहिती दूध संघाचे प्रभारी चेअरमन वसंतराव मोरे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. यावेळी त्यांच्यासोबत संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये व डॉ.सी.एम.पाटील हे उपस्थित होते. दूध संघाला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल दूध संघात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलतांना प्रभारी चेअरमन वसंतराव मोरे म्हणाले की, जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने यावर्षी ५० वर्षे पूर्ण केली असून, १९७१ ला स्थापना झाल्यानंतर प्रथमच अत्याधुनिकतेची कास धरत, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त दूध संकलन व प्रक्रिया व्हावी तत्कालीन दुग्धविकास मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नातून याकरिता ७७ कोटी रुपये खर्च करुन आधुनिक दूध प्रक्रिया व दुग्धजन्य पदार्थ प्रकल्पाची उभारणी केली आहे. जुन्या प्लॅन्टद्वारे आजवर आम्ही ३ लाख लिटर दूधावर प्रक्रिया करत होतो. या नवीन प्लॅन्टमुळे आम्ही आता ५ लाख लिटर दुधावर अत्याधुनिक मशिनरीद्वारे प्रक्रिया करणार असून, दूध पॅकिंगची क्षमता ३ लाख लिटरपर्यंत झाली आहे. यासोबतच पनीर, सुगंधी दूध, श्रीखंड, लस्सी या दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन व पॅकिंग प्लॅन्टचे लवकरच उद्‌घाटन होणार आहे.

७९९ गावांना ८१ फिरत्या कृत्रिम रेतन केंद्रातर्फे सेवा

सन २०२० – २१ या वर्षात संघाच्या सभासद संस्थांची संख्या ६७२ झाली असून, नवीन वर्षात ३२ प्राथमिक दूध उत्पादक संस्थांचा त्यात समावेश आहे. सद्यस्थितीत सरासरी २,६२,३३० लिटर प्रतीदिन दूध संकलन होत असून, मागील वर्षाच्या तुलनेत दुध संकलनात वाढ झाली आहे. या व्यतिरिक्त दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या सुविधेकरिता ७९९ गावांना ८१ फिरत्या कृत्रिम रेतन केंद्रामार्फत सेवा पुरविली जात असून, जंत निर्मूलन लसीकरण कार्यक्रमासाठी प्राथमिक दूध उत्पादक संस्था पातळीवर ३१.५७ लाखांचे अनुदान दिले आहे. दुधाळ जनावरे खरेदीसाठी आयसीआयसीआय बँकेमार्फत १०१२ जनावरे खरेदी करण्यासाठी बँकेने ६.१६ कोटी रुपयांचे कर्ज दूध उत्पादकांना दिले असून, पशूविमा अंतर्गत ५३ दूध उत्पादकांना २९.५४ लाख रुपयांची भरपाई मिळवून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे संघाने सुमारे २०,०७५ किलो मका व ज्वारी बियाणे हिरवा चारा उत्पादनासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना पुरविले आहे.

पेढा, खव्याची निर्मिती, श्रीखंडात नवीन फ्लेवर

कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी सांगितले की, दुधाबरोबर दुग्धजन्य पदार्थ निर्मितीसाठी जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाने पुढाकार घेतला असून, सुगंधी दूध, श्रीखंड, लस्सी व पनीर यांच्या उत्पादनासोबतच खवा आणि पेढा या दोन नव्या उत्पादनांची निर्मितीही सुरु केली आहे. तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना गतवर्षी पासून म्हशीच्या दुधासाठी सरासरी ४५.८० रुपये प्रति लिटर तर गाईच्या दुधासाठी २६.९८ रुपये प्रति लिटर अदा करण्यात येत आहेत.

असा उभा राहिला प्रकल्प

संघाला राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत २४.३८ कोटीच्या मंजूर अनुदानापैकी २२ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून, या आधुनिक प्रकल्पासाठी ७७.४१कोटी खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी ४०.४२ कोटी रुपयांचे राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड (एन.डी.डी.बी.) कडून अल्पदराने दीर्घ मुदतीचे कर्ज मंजूर करण्यात आलेले आहे. त्यापैकी संघाने २८.१६ कोटी रुपयांची उचल केली असून, संघाच्या हिश्श्याची १२.३५ कोटी रुपयांच्या रक्कमेपैकी १२.१३ कोटी स्वतःच्या भाग भांडवलातून दिली आहे. याव्यतिरिक्त ३५ कोटी रुपये दुग्धशाळा, दूध शीतकरण केंद्र आणि पशुखाद्य कारखाना यांच्या बळकटीसाठी संघाच्या स्वतःच्या निधीमधून खर्च करण्यात आले आहेत.

१०० कोटी रुपयांच्या भविष्यकालीन योजनांची आखणी

प्रभारी चेअरमन वसंतराव मोरे पुढे बोलतांना म्हणाले की, भविष्यात १०० कोटी रुपयांच्या भविष्यकालीन योजनांची आखणी करण्यात आली आहे. यात २००० मे.टन क्षमतेच्या दूध भुकटी साठविण्यासाठी गोदामाची उभारणी, २००० मे.टन क्षमतेच्या लोणी साठविण्यासाठी शीतगृहाची उभारणी, चाळीसगाव येथे एम.आय.डी.सी.कडून घेतलेल्या खुल्या जागेवर १ लाख लिटर दूध संकलन क्षमतेच्या शीतकरण केंद्राची उभारणी, २०० मेट्रीक टन उत्पादन क्षमतेच्या पशुखाद्य कारखान्याची उभारणी, ३० मेट्रीक टन दूध भुकटी उत्पादन क्षमतेच्या नवीन प्लॅन्टची उभारणीसह आईसक्रीम व चीज प्लॅन्ट उभारणीचा समावेश आहे.

उदघाटन समारंभ पुढे ढकलला
अचानक सुरु झालेल्या अवकाळी पावसामुळे उद्‌भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे दि. ५ डिसेंबरचा उद्‌घाटन सोहळ्याचा समारंभ पुढे ढकलण्यात आला असून, ५ डिसेंबरनंतर अवघ्या चार ते पाच दिवसात मान्यवरांच्या तारखा मिळाल्यानंतर उद्‌घाटन सोहळा करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी वसंतराव मोरे यांनी दिली आहे.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -