fbpx

चोपडा तालुक्यात बोगस बियाण्यांची ६० पाकिटे जप्त; गुन्हा दाखल

mi-advt

जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून जिल्हा गुणवत्ता नियंत्रक अधिकारी अरुण तायडे यांच्या भरारी पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने वाळकी (ता.चोपडा) येथे एका राहत्या घरी अचानक धाड टाकून शासनाची मान्यता नसलेली एचटी बीटीं बोगस कापूस बियाण्यांची 60 पाकिटे जप्त केल्याची कारवाई केली आहे. याबाबत गुणवत्ता नियंत्रण अधिकारी तायडे यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिसात बोगस बियाणे विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे बोगस बियाणे विक्रेते व दलालांमध्ये खळबळ उडाली आहे.

जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर व कृषी विकास अधिकारी वैभव दत्तात्रय शिंदे यांना वाळकी (ता.चोपडा) येथे बोगस एचटी बीटी कापूस बियाणे विक्री होत असल्याची गोपनीय माहिती दूरध्वनीवरून मिळाली. त्याची दखल घेत जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी अरुण श्रीराम तायडे, चोपडा तालुका कृषी अधिकारी पी. व्ही. देसाई व पंचायत समितीचे कृषी अधिकारी डी. एम. शिंपी यांच्याभरारी पथकाने  संध्याकाळी  दि. २१ मे रोजी शुक्रवारी वाळकी ता चोपडा येथे पांडुरंग शामराव ढिवर यांच्या घरी अचानक धाड टाकून बोगस बियाणेची चौकशीसाठी घराची झडती घेण्याचा प्रयत्न केला. परंतू ढिवर यांची पत्नी व मुलाने घराच्या झाडाझडती घेण्यास तीव्र विरोध केला. यावेळी तायडे यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आराक यांचेशी संपर्क करून पोलीस बंदोबस्ताची मागणी केली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे, पो.ना. रितेश चौधरी, होमगार्ड रोशन बाविस्कर, प्रदीप शिरसाठ, महिला होमगार्ड रत्ना बडगुजर तात्काळ वाळकी येथे दाखल झाले.

यावेळी पोलीस बंदोबस्तात कृषी विभागाच्या भरारी पथकाने पांडुरंग शामराव ढिवर यांच्या घराची झडती घेतली असता घराच्या मागील बाजूस असलेल्या संडास मध्ये शासनाची मान्यता नसलेली सुमारे ६० हजार रुपये किंमतीची एचटी बीटी बोगस कापूस बियाण्यांची महालक्ष्मी नाव असलेले ५० पाकिटे पांढऱ्या प्लास्टिक गोणीत आढळून आल्याने जप्त करण्यात आली. त्यातील दोन पाकिटे नमुने म्हणून नागपूर येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. बोगस बीटी कापूस बियाणे विक्री प्रकरणी गुणवत्ता नियंत्रण अधिकारी अरुण श्रीराम तायडे यांच्या फिर्यादीवरून पांडुरंग शामराव ढिवर (वय ४५) रा.वाळकी (ता.चोपडा) यांचे विरुद्ध ग्रामीण पोलीस स्टेशनला विना परवाना बियाणेची साठवणूक व विक्री केल्यामुळे बियाणे अधिनियम १९६८ चे कलम- ७,८,९,१०, ११,१२,१३,१४ व १९६६ चे खंड ७ महाराष्ट्र कापूस बियाणे कायदा अधिनियम २००९ व २०१० कलम १० तसेच पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ चा खंड ७,८, १५ (१) (२) १६ (१) च्या तरतुदींचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज