रावेर, यावल तालुक्यातील ५१ शेतकऱ्यांनी भरले ३३ लाखांचे वीजबिल

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२१ । महावितरणच्या महा कृषी ऊर्जा अभियानास जळगाव जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सावदा येथे शुक्रवार दि.२६ रोजी ५१ शेतकऱ्यांनी ३३ लाखांचे वीजबिल भरून कृषिपंपांच्या थकबाकीतून मुक्त होण्याचा मान मिळविला. महावितरणच्या जळगाव मंडलाचे अधीक्षक अभियंता फारूक शेख यांच्या हस्ते या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

महावितरणच्या सावदा विभाग कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अधीक्षक अभियंता फारूक शेख व कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे यांनी परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधत या महा कृषी ऊर्जा अभियानाचे महत्त्व पटवून दिले. कृषिपंप वीजबिलाच्या थकबाकीत सुमारे ६६ टक्के सूट मिळविण्याची संधी आहे. या अभियानात सहभागी होऊन कृषिपंपाचे वीजबिल कोरे करावे तसेच चालू वीजबिलांचा नियमित भरणा करावा, असे आवाहन करून बिल भरण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद देत सावदा विभागातील ५१ शेतकऱ्यांनी एकाच दिवशी ३३ लाख २४ हजार ६२० रुपयांचे वीजबिल भरले आणि थकबाकीमुक्त होण्याचा मान मिळवला.

शेतकऱ्यांचा सत्कार
रावेर उपविभागातील ७ शेतकऱ्यांनी ३ लाख ३३ हजार ३७० रुपये, यावल उपविभागातील ७ शेतकऱ्यांनी ८ लाख ३४ हजार ७८० रुपये, फैजपूर उपविभागातील ३ शेतकऱ्यांनी २ लाख ४८ हजार ४२ रुपये तर सावदा उपविभागातील ३४ शेतकऱ्यांनी १९ लाख ८ हजार ५० रुपयांचे वीजबिल भरून महा कृषी ऊर्जा अभियानाचा लाभ घेतला आहे. या सर्व ग्राहकांचा अधीक्षक अभियंता फारूक शेख यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. वीजबिल वसुलीसाठी प्रयत्न केल्याबद्दल कुंभारखेडा शाखेचे कनिष्ठ अभियंता विशाल नेमाडे व तंत्रज्ञ गुरुदास पाटील तसेच रावेरचे तंत्रज्ञ लीलाधर कोळी यांचाही श्री.शेख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे, उपविभागीय अभियंते राजेश नेमाडे (सावदा), दिलीप मराठे (यावल), अनिल पाटील (रावेर) व राकेश फिरके (फैजपूर), सहायक अभियंता देवेंद्र भंगाळे, नीलेश भंगाळे, धनंजय चौधरी, मिलिंद इंगळे यांनी वीजबिल वसुलीसाठी तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला.

नियमित वीजबिलाचा भरणा करावा
कृषिपंप वीजबिलांच्या वसुलीतून ६६ टक्के निधी त्या-त्या ग्रामपंचायत व जिल्ह्याच्या क्षेत्रातच वीजयंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी वापरला जाणार आहे. त्यामुळे या ऐतिहासिक योजनेत सहभागी होऊन कृषिपंपाचे वीजबिल कोरे करावे तसेच चालू वीजबिलांचा नियमित भरणा करावा, असे आवाहन अधीक्षक अभियंता शेख फारुख यांनी केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज