fbpx

अबब..! जळगाव शहरातील ४८०० खांब लाईटविनाच

महापौर, उपमहापौर, आयुक्तांकडून ‘ईईएसएल’चे अधिकारी धारेवर

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२१ । गेल्या दोन वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात शहरातील रस्त्यांवरील खांबांवर लावलेले पूर्वीचे सीएफएल लाईट काढून त्या जागेवर नवीन एलईडी लाईट लावण्याचे आदेश राज्यातील सर्व नगरपरिषदा, महापालिकांना देण्यात आले होते. त्यानुसार शासनाच्या आदेशीत ईईएसएल या कंपनीकडून जळगाव शहरात एलईडी लाईट लावण्यात आले. त्या लावलेल्या लाईटची मेंटेनन्सची जबाबदारी ही करारनाम्यातील अटीनुसार सात वर्षांच्या करारावर कंपनीकडून लेखी स्वरूपात ठरली आहे. 

सुरूवातीला लाईट लावताच शहरात झगमगाट दिसत होता. परंतु पूर्णपणे लाईट लागल्यानंतर काही दिवसांतच सदरचे काही लाईट हे बंद झाले. तसेच काही ठिकाणी दिवसा सुरू तर रात्री बंद अशी या लाईटची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे सतत नागरिकांकडून यासंदर्भात तक्रारी वाढत असताना सदर बंद लाईटबाबत महापालिकेने स्थापन केलेल्या ‘महापौर सेवा कक्ष’सह नगरसेवकांकडूनही महापौर, उपमहापौरांकडे सातत्याने तक्रारी येत आहेत. याची गंभीरतेने दखल घेऊन महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी आज गुरुवार, दि. 17 जून 2021 रोजी आपल्या दालनात उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त  सतीश कुलकर्णी व महापालिका विद्युत समिती सभापती सौ.पार्वताबाई भिल यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेच्या विद्युत विभागासह ‘ईईएसएल’, ‘महावितरण’ व ‘ईईएसएल’ने नियुक्त केलेले वेंडर यांची संयुक्त बैठक घेतली. 

त्यात महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी सर्वांकडून विजेसंदर्भातील सर्वच विषयांवर विस्तृत चर्चा केली. त्यात ‘महावितरण’च्या अधिकार्‍यांशी सविस्तर चर्चा करून काही विषय मार्गी लावण्याची भूमिका मांडली गेली, तर ‘ईईएसएल’च्या अधिकार्‍यांना धारेवर धरत शहरातील ज्या खांबांवर लाईट नाही तेथे तत्काळ एलईडी लाईट लावावेत. हे काम 30 जून 2021 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावे. तसेच संबंधित लाईटची चाचणी घेण्यासह मेंटेनन्सचे कामही तत्काळ सुरू करावे, अशी सूचना केली. यासाठी महापालिकेच्या विद्युत विभागाचे आपणास संपूर्णपणे सहकार्य मिळेल, अशी ग्वाही दिली.

‘ईईएसएल’चे अधिकारी प्रसाद गांगोळे, ‘महावितरण’च्या सौ.रत्ना पाटील व धीरज बारापात्रे, ‘ईईएसएल’चे वेंडर श्री. यादव, महापालिका विद्युत विभागप्रमुख एस.एस. पाटील, सहाय्यक अभियंता विलास पाटील, श्री.शिंपी, युवराज मेढे, कमलाकर राणे, राधाकृष्ण बोरोले, मिलिंद बेंडाळे आदी यावेळी उपस्थित होते.

महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन गेल्या मार्चमध्ये पदभार स्वीकारल्यापासून शहरात विविध तक्रारींच्या अनुषंगाने पाहणी दौरा करीत आहेत. यात त्यांच्यासमवेत चर्चेवेळी, ‘महापौर सेवा कक्ष’च्या माध्यमातून तसेच नगरसेवकांकडून प्राप्त अशा शहरातील पथदिव्यांच्या संदर्भातील तक्रारींचा पाढा सातत्याने वाचला जात होता. त्या अनुषंगाने आज त्यांनी आपल्या दालनात उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त श्री.सतीश कुलकर्णी व महापालिका विद्युत समिती सभापती सौ.पार्वताबाई भिल यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेच्या विद्युत विभागासह ‘ईईएसएल’, ‘महावितरण’ व ‘ईईएसएल’ने नियुक्त केलेले वेंडर यांची संयुक्त बैठक घेतली. 

या बैठकीत ‘ईईएसएल’ने सर्वेक्षणाच्या आधारे शहरातील खांबांवर जवळपास 15 हजार 500 एलईडी लाईट लावल्याचे सांगून अलीकडच्या काळातही काही वाढीव वस्त्यांच्या ठिकाणच्या खांबांवरही एलईडी लाईट लावण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे आम्हाला आता काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र द्या, अशी मागणी केली. त्यावर महापौर, उपमहापौर व आयुक्तांनी त्यांना धारेवर धरत अनेक खांबांवरील लाईट बंदावस्थेत आहेत, ते का बंद आहेत याची चौकशी करा आणि नव्याने लाईट लावा. काही ठिकाणचे लाईट दिवसा, तर काही ठिकाणी रात्री लाईट सुरू असतात. त्याचे कारण तुम्ही मेंटेनन्स काहीही केलेले नाही. त्यामुळे येत्या 30 जूनपर्यंत शहरासह स्लम एरियातील सर्व खांबांवर लाईट लागले पाहिजेत, मेंटेनन्सचे कामही तत्काळ सुरू करावे तसेच ‘सीसीएमएस’चेही कामही सुरू करावे. जोपर्यंत संपूर्ण काम चोखपणे पूर्ण होऊन त्याचे मेंटेनन्स सुरू होत नाही तोपर्यंत तुम्हाला काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मिळणार नाही. आज सांगितलेल्या कामांची पूर्तता झाली किंवा नाही, याचा आठवडाभरात आढावा घेऊ.

याचवेळी ‘महावितरण’च्या अधिकार्‍यांना महापौर, उपमहापौर व आयुक्तांनी शहरातील वाकलेले खांब, रस्त्याच्या मधोमध, गटारींमध्ये उभे असलेले खांब काढून ते दुसर्‍या जागेत हलवावेत, त्याचप्रमाणे रस्त्याच्या मधोमध येणारे ट्रान्स्फॉर्मर (डीपी) हटविले जावेत, अशी मागणी करून यासाठी सहकार्याची भूमिका घेत मेहरुणमध्ये ‘अमृत’ योजनेचे काम सुरू आहे. तेथे तीन ठिकाणचे वीजखांब शिफ्टिंग करणे बाकी आहे. यासंदर्भात इस्टिमेटही मंजूर केले आहे. मात्र ‘महावितरण’कडून कार्यवाही नाही, ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यावर ‘महावितरण’च्या अधिकार्‍यांनी सकारात्मकता दाखवत तुम्ही आम्हाला चर्चेतील सर्व विषय लेखी स्वरूपात दिल्यास आम्ही नक्की तुम्हाला ही कामे मार्गी लावण्यासंदर्भात सहकार्य करू, यासाठी निधीची तरतूद करा, असे सांगत आश्वस्त करून सध्या शहरातील 317 उभे अनावश्यक खांब काढणे सुरू असल्याचे सांगितले.

महापालिकेच्या विद्युत विभागप्रमुखांनीही शहरात लाईट लावण्यासंदर्भात आम्ही 16 हजार खांबांचे सर्वेक्षण केले असून, जवळपास 4 हजार 800 खांबांवर एलईडी लाईट नाहीत. सद्यःस्थितीत एकूण 6 हजार 500 खांबांवर एलईडी लाईट बसविणे गरजेचे आहे. यात स्लम एरियासह शहरातील वाढीव भागांत पथदिव्यांसंदर्भात काहीही नियोजन नसल्याचे सांगत ‘महावितरण’ने सोयीनुसार ग्राहकांना वीज कनेक्शन दिल्यामुळे पथदिव्यांच्या खांबांच्या ठिकाणी शॉर्टसर्किटसारखे प्रकार घडतात. त्यासाठी मदत करावी, आम्ही आपणास सर्वतोपरी सहकार्य करू, असे सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज