42 प्रवासी घेऊन निघालेल्या शिवशाही बसने घेतला पेट ; घटनेचा थरार VIDEO पाहा

जळगाव लाईव्ह न्यूज । १ नोव्हेंबर २०२२ । राज्यात खासगी बसला लागणाऱ्या आगीच्या घटना सातत्याने वाढताना दिसून येत आहे. गेल्या महिन्यात नाशिकमध्ये खासगी बसला आग लागून प्रवाशांचा बळी गेल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली असतानाच, आज पुण्यातील येरवड्यातही शिवशाही बसला आग लागल्याची घटना समोर आलीय. या बसमधून ४२ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने सर्व ४२ प्रवासी खाली उतरल्यानंतर ही आग लागल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

पुण्यातील येरवडा येथील शास्त्री चौकात ही घटना घडली. यवतमाळ-चिंचवड शिवशाही बसने भररस्त्यात पेट घेतला. बस नादुरुस्त झाल्याने चालकाने ती रस्त्याच्या बाजूला थांबवली. त्यानंतर बसमधील सर्व ४२ प्रवाशांना खाली उतरवले. काही वेळातच या बसने पेट घेतला.

चालकाने वेळीच बस थांबवली आणि सर्व प्रवाशांना खाली उतरवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या दुर्घटनेत कुणालाही इजा झाली नाही. मात्र, या आगीत शिवशाही बस जळून खाक झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ IBNLokmat ने त्यांच्या वेबसाईटवर प्रसारित केला आहे.

येरवडा शास्त्री चौकात बसने पेट घेतल्यानंतर एकच गोंधळ उडाला. सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले होते. बसला आग लागल्याची माहिती मिळताच वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. वाहतूक पोलिसांनी वाहतूक बंद केली होती. तर, अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळात आगीवर नियंत्रण मिळवले.