जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२२ । चाळीसगाव-धुळे दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. ती म्हणजे आता ११ एप्रिलपासून चाळीसगाव-धुळे मेमू ट्रेन क्षमतेने धावणार आहे. दिवसभरातून मेमू ट्रेनच्या एकूण चार फेऱ्या होणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
पॅसेंजर ट्रेनमधून रूपांतरीत झालेली चाळीसगाव-धुळे मेमू ट्रेन तब्बल दोन वर्षांनी १३ डिसेंबर २०२१ रोजी रुळावरून धावली हाेती. मात्र, दिवसभरातून केवळ दोनच फेऱ्या होत असल्याने प्रवाशांचे हाल हाेत असत. आता राज्यात कोरोनाचे सर्व निर्बंध हटवल्याने ११ एप्रिलपासून मेमू ट्रेन पूर्ण क्षमतेने धावणार आहे.
मुंबई लोकलच्या धर्तीवर ही रेल्वे सुरू केल्याने नागरिकांना अत्याधुनिक सुविधा मिळत आहेत. दरम्यान, एसटी कर्मचारी पाच महिन्यांपासून संपावर गेले आहेत. त्यात खासगी वाहनधारकांची मनमानी व मेमू ट्रेनच्या दोनच फेऱ्यांमुळे प्रवाशांचे हाल होत हाेते. त्यामुळे चार फेऱ्या पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली हाेती. यासाठी विविध सामाजिक संघटनांकडून अांदाेलनाचा इशाराही दिला हाेता.
या वेळेत पूर्ण क्षमतेचे धावणार मेमू
आता कोरोनाचे सर्व निर्बंध हटल्याने मेमू ट्रेनही पूर्ण क्षमतेने धावणार आहे. ११ एप्रिलपासून मेेमूच्या नेहमीप्रमाणे दिवसभरात चार फेऱ्या होतील. चाळीसगाव येथून सकाळी ६.३० व ९.५० वाजता तसेच दुपारी १.४० व सायंकाळी ५.३० या वेळेत ही मेमू ट्रेन धुळ्याकडे रवाना होईल.