⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

शिवछत्रपतींच्या अश्वारुढ पुतळ्याचे 26 सप्टेंबर रोजी चाळीसगाव शहरात आगमन

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२१ ।  गेल्या अनेक वर्षापासून चाळीसगावकरांचे स्वप्न असलेल्या अश्वारुढ पुतळ्याचे आगमन चाळीसगावात दिनांक 26 सप्टेंबर रोजी होणार आहे. चाळीसगाव मध्ये शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा व्हावा यासाठी अनेक शिवप्रेमी संघटनांनी वेळोवेळी आंदोलने केली. उपोषणे केली. राजकीय नेत्यांना निवेदने वगैरे दिली. रास्तारोको केली, अशा अनेक प्रकारची आंदोलने केली. तसेच चाळीसगावातील लोकप्रतिनिधी यांनी शासन दरबारी केलेला पाठपुरावा या सर्वांचे फळ म्हणजे चाळीसगावी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे काम नगरपालिकेच्या माध्यमातून गेल्या तीन ते चार वर्षापासून शहरातील सिग्नल चौकामध्ये प्रत्यक्ष सुरु झाले होते. मात्र शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याची प्रतीक्षा सर्व शहरवासीयांना होती. अखेर आता सर्व चालीसगवकारांचे हे स्वप्न 26 सप्टेंबर रोजी प्रत्यक्षात उतरणार आहे. म्हणजेच चाळीसगावला शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचे आगमन होणार आहे.

नगरपालिकेच्या माध्यमातून शिवछत्रपतींच्या स्मारकाचे काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. दरम्यान शिवछत्रपतींचा पुतळा आणण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असल्याचे नगरसेवक घृष्णेश्वर पाटील यांनी जळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले. तसेच शिवपुतळ्याच्या आगमनानंतर आमदार, खासदार, नगराध्यक्ष, नगरसेवक आदींच्या बैठकीमधून पुढील दिशा ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर चाळीसगावकरांचे स्वप्न लवकरच पूर्णत्वास येणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.