एसटी विलीनीकरणाचा मुद्दा कायम; महामंडळाचे २० दिवसात २० कोटींचे नुकसान

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ नोव्हेंबर २०२१ । एसटी विलीनीकरणावरून सुरु असलेलं आंदोलन २० व्या दिवशीही सुरूच होतं. या आंदोलनामुळे एसटीची जिल्ह्यातील ११ आगारांतील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे २० कोटींचे नुकसान झाले आहे.

राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी विभागात ३ हजार ८६४ कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. राज्य सरकारने घसघशीत पगारवाढ करूनही एसटी कामगार-कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर अडून बसले आहे.  एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. तर प्रशासनाने कर्मचाऱ्यांना आंदोलनासाठी प्रोत्साहित करणे व कामावर रुजू होऊ न देणे या कारणासाठी आतापर्यंत जळगाव विभागातील १५३ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. २० दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनात एसटीचे २० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वाहतूक अधीक्षक दिलीप बंजारा यांनी व्यक्त केला आहे. प्रशासनाने धुळे मार्गावर खासगी शिवशाही सुरू केली असली तरी प्रवाशांकडूनही या बसेसला फारसा प्रतिसाद नाही.

विभागात १५३ कर्मचारी निलंबित : 

जळगाव विभागात आतापर्यंत १५३ कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. यात जळगाव १२, रावेर १५, एरंडोल ११, अमळनेर १६, चाळीसगाव २०, पाचोरा १२, भुसावळ १४, मुक्ताईनगर १२, जामनेर ११, चोपडा ८, यावल ८, विकाशा १२, वि. भांडार १, टीआरपी १ अशा कर्मचाऱ्यांचा निलंबनात समावेश आहे.

इतर मार्गावर शिवशाही नसल्याने प्रवाशांची गैरसोय
एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण करण्यासाठी ७ नोव्हेंबरपासून आंदोलन सुरू आहे. विभागातून केवळ धुळे मार्गावरच शिवशाही धावत असल्यामुळे जिल्ह्यांतर्गत व जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे इतर मार्गांवरही शिवशाहीप्रमाणे बससेवा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -