कुऱ्हा येथे दुकाने फोडून २ लाखांची रोकड लांबविली

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२१ । मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा येथील बंद दुकाने फोडून या दुकानांतून २ लाख रुपयांची रोकड लांबविण्यात आल्याची घटना बुधवार दि.१० रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी कुर्‍हाकाकोडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुक्ताईनगर तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास कुऱ्हा येथील दोन दुकाने फोडून २ लाखांचा ऐवज लंपास करण्यात आल्याची घटना घडली आहे. कुर्‍हा येथील दिनेश जैस्वाल यांच्या अंबिका ट्रेडर्स या दुकानातून ४३ हजार तसेच कापूस व्यापारी सुमित चौधरी यांच्या दुकानातून १ लाख ५५ हजार रुपयांची रोकड लांबविण्यात आली आहे. दुकानावरील माणसे सकाळी दुकान उघडण्यासाठी आले तेव्हा दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर ही माहिती पोलिसांना माहिती कळविण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सचिन डोंगरे, विनायक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यावेळी श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले.

चोरटा सीसीटीव्हीत कैद
एका दुकानाच्या सीसीटीव्हीत चोरटा कैद झाला आहे. यात चोरट्याने डोक्यावर टोपी व तोंडाला रूमाल बांधला असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध कुर्‍हाकाकोडा दूरक्षेत्रात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक निकम करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज