⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

गणेश विसर्जन मार्गासंदर्भात महापालिका अधिकार्‍यांची लवकरच बैठक घेणार: महापौर जयश्री महाजन

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२१ । यंदाच्या गणेशमूर्ती विसर्जन मार्गासंदर्भातील विविध स्वरूपातील नियोजन करण्याच्या अनुषंगाने शहरातील इच्छादेवी चौक ते मेहरुण तलावपर्यंतच्या रस्त्यासह मेहरुण तलाव परिसराची महापौर जयश्री  महाजन यांनी आज दि.3 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत अप्पर पोलिस अधीक्षक श्री.चंद्रकांत गवळी, जिल्हा पोलिस उपअधीक्षक कुमार चिंथा, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे, रामानंदनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण शिंदे उपस्थित होते.
याप्रसंगी महापौर जयश्री महाजन यांच्यासह सर्व पोलिस अधिकार्‍यांनी गणेश विसर्जन मार्गाचे नेमके कसे नियोजन करता येईल? कुठे बॅरिकेटस् लावायला हवेत? कुठे निर्माल्य संकलनाची व्यवस्था करावी? मिरवणूक मार्गावर कुठे-कुठे खड्डे पडले आहेत व कुठे डागडुजी करणे आवश्यक आहे? वाहतूक व्यवस्थेचे नियोजन कशा पद्धतीने करावे लागेल? महापालिकेसह पोलिस कर्मचारी संख्येचे बंदोबस्ताकामी नियोजन कसे करता येऊ शकेल? गणेश घाटासह आणखी किती ठिकाणी निर्माल्य संकलन केंद्रे उभारता येऊ शकतात? आदी विषयांवर नियोजनाच्या दृष्टिकोनातून संबंधितांमध्ये विस्तृत चर्चा झाली.
महापौर जयश्री महाजन म्हणाल्या, की शहरातील गणेशमूर्तींचे विसर्जन शांततेत, शिस्तबद्ध व सुनियोजनातून व्हावे, यासाठी आज आम्ही सर्वांनी विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी करून बर्‍याच विषयांवर चर्चा केली. महापालिकेची यात असणार्‍या जबाबदारीच्या अनुषंगाने लवकरच महापालिका अधिकारी, कर्मचार्‍यांची बैठक घेऊन यासंदर्भात नियोजन केले जाईल.
अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी म्हणाले, की शहरातील गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक मार्गाची आम्ही सर्वांनी आज पाहणी केली. तसेच त्यासंदर्भात विविध विषयांवर महापौर जयश्री महाजन यांच्यासमवेत विस्तृत चर्चाही केली. यानंतर आम्ही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विषयांचे संपूर्णपणे नियोजन करू.