जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२१ । एरंडोल येथील सुखकर्ता फाउंडेशन आणि जळगाव येथील केशवस्मृती सेवा संस्था समूह यांच्या संयुक्त विद्यमाने एरंडोल येथे मोफत हिमोग्लोबिन तपासणी व थॅलेसिमिया जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात १२० नागरिकांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.
एरंडोल येथील सुखकर्ता फाउंडेशन आणि जळगाव येथील केशवस्मृती सेवा संस्था समूह यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.१७ एरंडोल येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरात मोफत हिमोग्लोबिन तपासणी व थॅलेसिमिया जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. केशवस्मृती सेवा संस्था समूहाच्या ‘थॅलेसिमिया मुक्त मिशन’च्या प्रकल्प प्रमुख डॉ.सई नेमाडे व प्रकल्प समनव्यक भानुदास येवलेकर यांच्या टीमने १२० नागरिकांचे एच.बी. इलेक्ट्रोफेरेसिस या रक्तचाचणीसाठी सँपल घेतले. सर्व वयोगटातील नागरिकांनी ही चाचणी करून घेतली. शिबीराच्या यशस्वीतेसाठी दक्षिणमुखी हनुमान मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी युवराज पाटील, विक्रम चौधरी, राजू चौधरी, नाना महाजन, गोरख महाजन, प्रवीण चौधरी, सागर चौधरी, राहुल चौधरी, नितीन पाटील, पवन चौधरी, रोहित मराठे, विक्की मराठे, कैलास चौधरी, अजय मराठे, बाळा धनगर, गोरख चौधरी, सुखकर्ता फाउंडेशनचे शेखर बुंदेले, सागर ठाकूर आदींनी परिश्रम घेतले. नगरसेवक डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
युवक-युवतींनी आरोग्यकुंडलीचा आग्रह धरला पाहिजे
सद्यस्थितीत थॅलेसिमिया या रक्त विकाराचे ५ लाख रुग्ण भारतात आहेत व ५ कोटी नागरिक हे थॅलेसिमियाचे वाहक आहेत. त्यांना कुठलाही त्रास होत नसल्यामुळे ही चाचणी केल्यानंतरच त्यांच्या पुढील पिढीमध्ये येऊ शकणारा हा अनुवांशिक रक्तविकार आपण रोखु शकतो. म्हणून याबाबत जागरूकता आणणे महत्वाचे आहे. त्यासाठी असे शिबीर आयोजित करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ. सई नेमाडे यांनी केले. सुखकर्ता फाउंडेशनच्या अध्यक्ष व माजी उपनगराध्यक्षा डॉ. गीतांजली ठाकूर यांनी युवक-युवतींनी विवाहपूर्व ग्रह तारे, मंगळ कुंडलीच्या अभ्यासाऐवजी आरोग्यकुंडलीचा आग्रह धरला पाहिजे. त्यासाठी ग्रामीण भागात याविषयी जनजागृती करणे आवश्यक असल्यामुळे सुखकर्ता फाउंडेशनतर्फे हे शिबीर आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील किशोरवयीन युवती व महिला यांच्यामध्ये रक्तक्षयाचे प्रमाणही मोठया प्रमाणात असल्यामुळे या वर्गासाठी थॅलेसिमिया या आजाराबरोबरच रक्तक्षयाचे निदान या चाचणीच्या माध्यमातून होत असल्याचे समाधानही त्यांनी व्यक्त केले.