जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२२ । माहिती अधिकारात अर्ज केल्यानंतर पालिका प्रशासनाने तक्रारदार व माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश उपाध्याय यांना चुकीची माहिती पुरवण्यात आल्यान त्यांनी भुसावळ पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचे निलंबन करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. पुराव्यादाखल त्यांनी कागदपत्रेच दिल्याने मुख्याधिकार्यांच्या मात्र अडचणी वाढल्या आहेत.
शहरात केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत हरीत क्षेत्र विकासासाठी राज्य शासनाने 26 मे 2017 रोजी भुसावळ पालिकेला 2 कोटी 50 लाख 44 हजार 180 निधी मंजूर केला. पालिकेने या निधीतून शहरात मौजे सतारेमधील सर्वे नंबर 10 मधील आरक्षण क्रमांक 23 क्रीडांगण (स्टेडियम) या जागेची हरीत क्षेत्र विकासासाठी निवड केली मात्र हे काम करताना क्रीडांगणाचे आरक्षण न बदलताच अटल उद्यान निर्मिती करण्यात आली. विशेष म्हणजे या उद्यानाचे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते लोकार्पण झाल्यानंतर 4 मार्च 2020 रोजी पालिकेने आरक्षण बदलाचा ठराव (क्रमांक 43) करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. माहिती अधिकार कार्यकर्ते उपाध्याय यांनी या संदर्भात माहिती अधिकार टाकल्यानंतर त्यांना पालिकेने दिलेल्या ठरावाच्या कागदपत्रात तत्कालीन नगरसेवक प्रा.दिनेश राठी व पी.पी.नेमाडे हे दोघे सूचक-अनुमोदक दर्शवण्यात आले आहे मात्र नगरपालिकेतून उपाध्याय यांनी माहिती घेतल्यानंतर त्यात एम.एन.पाटील व एच.एम.ठाकूर हे दोघे सूचक व अनुमोदक असल्याचे उघड झाले.