⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

अतिदुर्गम गुजरदरी गावात पोहोचली कोविशील्ड लस

जळगाव लाईव्ह न्यूज | १९ सप्टेंबर २०२१ |  गुजरदरी म्हणजे चाळीसगाव तालुक्यातील सर्वात अतिदुर्गम गाव, नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातुन जातेगाव मार्गे औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड व वैजापूर तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या या गावात जाण्यासाठी जवळजवळ ५५ किमी प्रवास करावा लागतो. गावाचा इतर गावांशी संपर्क अतिशय कमी असल्याने कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत देखील येथे कोविड प्रादुर्भाव नाहीच्या बरोबरच होता. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण होत असताना भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून गुजरदरी येथे कोविड लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरात गावातील १५० ग्रामस्थांना कोविशील्ड लसीचा पहिला डोस देण्यात आला. गुजरदरी गावात मागीलवर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत रोगप्रतिकारक आर्सेनिक अल्बम औषधी शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई चव्हाण यांनी गावात जाऊन वाटप केल्या होत्या. सदर शिबिराबाबत व गावात लसीकरणाविषयी असणाऱ्या उदासीनतेबाबत त्यांना माहिती मिळताच त्यांनी आज शिबिराच्या दिवशी गुजरदरी गावाला भेट दिली व ग्रामस्थांशी संवाद साधून कोविड लसीकरणाविषयी जनजागृती केली.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे बुधाभाऊ चव्हाण, रामदास मेंगाल, गोटीराम गिर्हे, आत्माराम राठोड, दिलीप चव्हाण, सुदाम राठोड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पाटील सर, विवेक पाटील सर, दीपक पाटील सर, आशा सेविका शकुंतलाताई व तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे एल सी जाधव, कराडे MPW, CHO विश्वकर्मा मॅडम, चव्हाण आदी उपस्थित होते.