२०० कोटीची ‘ती’ घोषणा सुद्धा ठरणार पोकळ

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जानेवारी २०२३ । जळगाव शहरातील अतिशय हीन दर्जाचे झालेले रस्ते पूर्ण करण्यासाठी 200 कोटी रुपयांच्या निधीचे नियोजन केले असल्याची घोषणा नुकतीच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. मात्र मागील अनुभव लक्षात घेता ही घोषणा पोकळ ठरू शकते अशी चर्चा संपूर्ण जळगाव शहरात रंगू लागली आहे. (200cr jalgaon)

न्यायालयीन प्रकरणे किंवा इतर कोणतेही मुद्दे उपस्थित झाले नाही, तर याच वर्षाच्या जुलै अखेरीस किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला जळगाव शहर महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. या क्षणाला अर्धा जानेवारी महिना निघून गेला असून जून पासून पावसाळा येत असल्याने काम पूर्ण होऊ शकत नाहीत. यामुळे फक्त चार महिन्यात काम पूर्ण करण्याचे लक्ष बांधकाम विभागासमोर आहे.

गेल्या साडेचार वर्षात जळगाव शहरात विकास काम झाली नाहीयेत. काम मंजूर करण्यात आली आहेत. मात्र निधी अभावी ती पूर्ण होऊ शकत नाही. त्यातच नगरसेवकांमध्ये प्रचंड मतभेद आहेत. यांच्यातील राजकारणामुळे शहराचा विकास गुंतागुंतीचा झाला आहे.

इतकच नाही तर सध्या महानगरपालिका आयुक्तांमध्ये देखील सुरू असलेल्या वादामुळे गेल्या दीड महिन्यापासून एकही काम होऊ शकले नाही. आशातही हा निकालही अजून अपूर्ण आहे. यामुळे आता या दोनशे कोटींची घोषणा झाली आहे. पुढे याचे नियोजन करावे लागेल. मग टेंडर निघतील. पुढे जाऊन काम होतील. अशा वेळेस चार महिन्यात ही काम होणं अशक्य असल्याचे म्हटले जात आहे.

सध्या सुरू असलेल्या अमृत योजनेमुळे शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. मुख्य रस्ते केले जात असले तरी कॉलनी आणि गल्लीबोळातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे आहेत. मुख्य रस्ते होत असले तरी त्यांच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशावेळी 200 कोटी नियोजन कधी करणार आणि ती मिळणार केव्हा? काम मंजूर होणार कधी आणि कामा प्रत्यक्षात उतरणार कधी? असे कित्येक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना भेडसावत असून 200 कोटींची घोषणाही केवळ पोकळ ठरेल असे म्हटले जात आहे