१९० हिंदूंना भारतात येण्यापासून पाकिस्तानने रोखले

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ फेब्रुवारी २०२३ । पाकिस्तानात अन्याय अत्याचाराच्या झळा सोसणाऱ्या अल्पसंख्याक हिंदू समुदायाच्या १९० नागरिकांना भारतात येण्यापासून स्थानिक अधिकाऱ्यांनी किरकोळ कारणावरून खोडसाळपणे रोखल्याचे वृत्त समोर आले आहे. भारतात जाण्याच्या कारणावर अधिकाऱ्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांनी हिंदूंना सीमेवरून परतून लावले आहे.

सिंध प्रांतातील बालके व महिलांसह १९० हिंदू अनुयायी मंगळवारी सकाळी वाघा सीमेवर पोहोचले. त्यांच्याकडे विझा होता. ते तीर्थयात्रेसाठी भारतात येण्यास इच्छुक होते; पण पाकच्या आव्रजन अधिकाऱ्यांनी त्यांना भारतात जाण्यास मंजुरी दिली नाही. भारतात जाण्याचे ठोस कारण सांगू शकले नसल्याचे किरकोळ निमित्त पुढे करीत अधिकाऱ्यांनी हिंदूंना मज्जाव केल्याचे वृत्त पाकच्या माध्यमांनी दिले आहे. उल्लेखनीय बाब अशी की, पाकमधील हिंदू कुटुंबीय नेहमीच तीर्थयात्रेसाठी भारतात येत असतात. त्यानंतर ते भारतात प्रदीर्घ काळ वास्तव्य करतात. सद्यःस्थितीत राजस्थान व दिल्लीत मोठ्या संख्येने पाकिस्तानी हिंदू मुक्कामी आहेत.

दरम्यान, पाकची नोंदणीकृत लोकसंख्या १८ कोटी ६८ लाख ९० हजार ६०१ आहे. यात अल्पसंख्याक हिंदू समुदायाचे लोक २२ लाख १० हजार ५६६ एवढे (१.१८ टक्के) आहेत, अशी माहिती ‘सेंटर फॉर पीस अँड जस्टिस पाकिस्तान’ या संस्थेने दिली. पाकमधील बहुतांश हिंदू लोक गरीब आहेत. देशातील विधा व्यवस्थेत त्यांचे प्रतिनिधित्व नगण्य आहे. सिंध प्रांतात मोठ्या संख्येने हिंदू अनुयायी वास्तव्यास आहेत. त्यांची संस्कृती, परंपरा व भाषा मुस्लिम जनतेशी मिळतीजुळती आहे. तरीही हिंदूंना कट्टरपंथीयांच्या शोषणाचा सामना करावा लागत आहे.