fbpx

सहा गावांसाठी हतनूर धरणामधून सुटणार पाण्याचे आवर्तन

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२१ । ममुराबादसह परिसरातील पाच गावांना पाणी टंचाई उदभवू नये, यासाठी हतनूर धरणातून बिगर कृषक कामासाठी आवर्तन सोडण्यास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शनिवारी मान्यता दिल्यानंतर आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी हतनुर धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे 2.92 द.ल.घ.फु. बिगर सिंचन पाण्याचे आवर्तन सोडण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. यामुळे या गावांची पाणीटंचाईतून सुटका झाली असून त्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहेत.

जळगाव तालुक्यातील ममुराबाद, विदगाव, आवाड, खापरखेडा, तुरखेडा आणि नांद्रा खुर्द या गावांना पाण्याची टंचाई जाणवू नये यासाठी या गावांतील सरपंच व इतर ग्रामस्थांनी शनिवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन त्यांना हतनुर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्याची विनंती केली होती. या अनुषंगाने पालकमंत्र्यांनी 2.92 द.ल.घ.फु. पाण्याचे आकस्मिक आरक्षण करुन, हतनूर धरणातून हतनुर उजव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्यास तातडीने मान्यता दिली व या गावांसाठी पाणी सोडण्याचे निर्देश सर्व संबंधित विभागास दिले होते.

त्यानुसार जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी बिगरसिंचन पाणी वापर संस्थेने आवर्तन कालावधीत पाहणी पथक व वाहन निरिक्षणासाठी तयार ठेवावे. तसेच आवर्तन कालावधीत पुरेसा कर्मचारी वर्ग निरिक्षणाकरीता उपलब्ध करुन द्यावा. या अटींवर या गावांसाठी हतनूर उजव्या कालव्याद्वारे बिगर सिंचन पाण्याचे आवर्तन सोडण्याबाबतचे आदेश निर्गमित केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt