विनोद देशमुख, रवी देशमुखसह ११ जणांविरुध्द गुन्हा दाखल, तिघांना तीन दिवस कोठडी

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२२ । शहरातील रामदास कॉलनी येथील मनोकल्प कंपनीच्या कार्यालयात बळजबरीने प्रवेश करून लॅपटॉप, प्रिंटर, संगणक, सोने-चांदीचे शिक्के, लाकडी कपाट आणि रोकड असा एकूण १ लाख १४ हजार रूपयांचा ऐवज जबरीने वाहनात भरून घेऊन गेल्याप्रकरणी जितेंद्र उर्फ रवी देशमुख, विनोद देशमुख यांच्यासह ११ जणांविरुद्ध रामानंदनगर पोलिसात गुन्हा करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

जिल्हा परिषद कॉलनीत राहणारे मनोज लिलाधर वाणी यांचे रामदास कॉलनीत मनोकल्प नावाने ऑफिस आहे. दि.३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते ४ दरम्यान कार्यालयात बळजबरीने प्रवेश करून लॅपटॉप, प्रिंटर, संगणक, सोने-चांदीचे शिक्के, लाकडी कपाट आणि रोकड असा एकूण १ लाख १४ हजार रूपयांचा ऐवज जबरीने वाहनात भरून काही जण घेऊन गेले होते. याप्रकरणी मनोज वाणी यांच्या फिर्यादीवरून जितेंद्र उर्फ रवी बाबुराव देशमुख, विनोद पंजाबराव देशमुख, जगदीश पुंडलिक पाटील, मिलिंद नारायण सोनवणे, रितेश देवराम पाटील, कैलास पाटील, कलाबाई शिरसाठ, १ अनोळखी महिला व ३-४ इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, शनिवारी रामानंदनगर पोलिसांनी जितेंद्र उर्फ रवी देशमुख (४९, रा. अयोध्यानगर), रितेश पाटील (४२, रा. ख्यॉजमिया चौक) व कैलास पाटील (५१. रा. पिंप्राळा) व एकाला अटक करून दुपारी न्यायालयात हजर केले असता ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.