विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला मिळाली ऑनलाईन कोडिंग भाषेची जोड!

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ फेब्रुवारी २०२३ । देश दिवसेंदिवस प्रगती करीत असून तंत्रज्ञान जगाला आणखी जवळ आणत आहे. शालेय अभ्यासक्रम देखील लवकरच बदलणार आहे तत्पूर्वीच विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला तंत्रज्ञानाची जोड देण्याचे कार्य जळगावातील विद्या इंग्लिश स्कूलकडून करण्यात आले आहे. टेक महिंद्रा कंपनीच्या मेकर्स लॅबसोबत झालेल्या सामंजस्याने भामल (BHAML) ऑनलाईन एडिटरद्वारे विद्यार्थी सर्व कोडिंग भाषा आत्मसात करीत आहेत. इतकंच नव्हे तर विद्यार्थ्यांनी विद्यालयाची वेबसाईट तयार करीत त्यावर स्टुडंट कॉर्नर नावाचे एक दालन देखील सुरू केले आहे. भविष्याचा अंदाज घेत विद्या स्कूलतर्फे सुरू करण्यात आलेले हे एक अप्रतिम उदाहरण आहे.

गेल्या दोन वर्षापासून जळगावातील विद्या इंग्लिश स्कुलमध्ये इयत्ता ४थी ते ८वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भामल (BHAML) ऑनलाईन एडिटरचे प्रशिक्षण विनामूल्य देण्यात येत आहे. भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत गुरुवारी सकाळी स्टुडंट कॉर्नरचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. प्रसंगी स्पेक्ट्रम इंडस्ट्रीजचे संचालक नरेंद्र वाघ, विद्या स्कुलचे मुख्याध्यापक हॅरी जॉन, संचालक माधवी थत्ते, जि.जे.देवरे, सुनील भिरुड, नारायण बाविस्कर व शिक्षक वर्ग आदी तसेच ऑनलाईन माध्यमाद्वारे टेक महिंद्राचे निखील मल्होत्रा, सतीश खेडेकर, श्रीनिवास चेतनपल्ली, कांचन भोंडे आदी उपस्थित होते.

स्पेक्ट्रमचे संचालक नरेंद्र वाघ यांनी, आपल्याकडे अनेक संधी आहेत. आपण तरुण आहोत आणि युवा भारत निर्माण करायला आपला मोलाचा हातभार लागणार आहे. आयुष्यात येणाऱ्या अडचणींचा धैर्याने सामना करा. मनापासून अभ्यास करा. मोबाईल, इंटरनेटचा योग्य वापर न केल्यास अडचणी वाढतात. मोठे ध्येय गाठायचे असल्यास शालेय जीवनातच निश्चय करायला हवा. शिका, तंत्रज्ञानचा फायदा घ्या, वरिष्ठ आणि गुरुजनांचा आदर करा, असा सल्ला त्यांनी दिला.

टेक महिंद्रा कंपनीच्या मेकर्स लॅबचे प्रमुख अधिकारी निखील मल्होत्रा म्हणाले, आपल्या देशात नेहमी जय जवान, जय किसान असा नारा दिला जात होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यात बदल करीत जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान असा नारा दिला आहे. आज देशात जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान हे फक्त विद्या इंग्लिश स्कुलने साध्य केले आहे. आम्ही उपलब्ध करून दिलेल्या संधीचा आपण योग्य फायदा घेतला आहे, यातून आम्हालाही नवीन काही करण्याची उर्जा मिळेल, असे ते म्हणाले.

फिनलँडच्या राजदूतांनी केले कौतूक
टेक महिंद्रातर्फे गेल्या महिन्यात १० डिसेंबर रोजी पुणे येथे एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेत विद्या इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भामलचे केलेले सादरीकरण पाहून फिनलँडचे राजदूत यांनी देखील विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

भामल (BHAML) ऑनलाईन एडिटर म्हणजे काय?
एखादी वेबसाईट तयार करण्यासाठी काही ऑनलाईन शब्द, संकेतांक वापरले जातात. ऑनलाईन जगात वापरल्या जाणाऱ्या भाषेला कोडिंग लँग्वेज असे म्हणतात. टेक महिंद्रा कंपनीच्या मेकर्स लॅबतर्फे भामल (BHAML) ऑनलाईन एडिटर हे आपल्या भाषेत कोडिंग शिकविणारे तंत्र विकसित करण्यात आले आहे. विद्या इंग्लिश स्कूलमध्ये याच प्रणालीचा उपयोग केला जातो. विद्यार्थी स्वतःच वेबसाईट देखील तयार करतात.

विद्यार्थ्यांनी तयार केले संकेतस्थळ आणि स्टुडंट्स कॉर्नर
विद्या इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भामल (BHAML) ऑनलाईन एडिटरच्या माध्यमातून विद्यालयाचे संकेतस्थळ विकसित केले आहे. इतकंच नव्हे तर त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालविलेले ‘स्टुडंट्स कॉर्नर’ हे एक स्वतंत्र दालन देखील उभारले आहे. स्टुडंट्स कॉर्नरवर विद्यार्थी आपल्या कविता, कथा, चित्रे, प्रकल्प, नवनवीन माहिती आणि विचार अपलोड करतात. एका क्लीकवर सर्व माहिती सहज उपलब्ध होते.

विद्यार्थ्यांचा वाढला कोडिंगकडे कल
विद्या इंग्लिश स्कूलमध्ये भामल (BHAML) ऑनलाईन एडिटर (भारत मार्कअप लँग्वेज) चा उपयोग इयत्ता ४थी ते ७वीच्या वर्गातील विद्यार्थी करीत आहेत. दोन वर्षांपासून हा उपक्रम शाळेत विनामूल्य राबविण्यात येत असून त्यामुळे कोडिंग लँग्वेज शिकण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. भामल लॅब अंतर्गत पर्यवेक्षक अश्विनी पाठक, सुधीर पाटील यांच्यासह १७ विद्यार्थी इतरांना मार्गदर्शन करीत आहेत.